
मालाड कुरार व्हिलेज आप्पापाडा येथे वारंवार लागणाऱया आगींमुळे या ठिकाणी अद्ययावत सुविधा असणारे मिनी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या ठिकाणी हजारोंच्या संख्येने वसलेल्या झोपडय़ांसाठी हक्काची कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होणार आहे. यासाठी पी-उत्तर विभागाकडून जागा उपलब्ध करून दिल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अग्निशमन दल प्रशासनाकडून देण्यात आली.
मालाड पूर्व विभागातील कुरार व्हिलेज आप्पापाडा भागात गेल्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टी वस्ती वाढली आहे. दाटीवाटीने वसलेल्या या झोपडपट्टय़ांसाठी स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने या ठिकाणी घडलेल्या आगीच्या दुर्घटनांमध्ये मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आगीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाला पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिंडोशी मतदारसंघामध्ये येणाऱया कुरार व्हिलेज, आंबेडकर नगर, वाघेश्वरी मंदिरसमोर, जामऋषी नगरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी वन क्षेत्रातील झोपडपट्टीमध्ये लागलेल्या आगीत दीड हजाराहून अधिक झोपडय़ा जळून खाक झाल्या होत्या. शिवाय 12 वर्षीय मुलाचा मृत्यूही झाला. त्यामुळे या ठिकाणच्या रहिवाशांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
म्हणूनच घेतला निर्णय
दिंडोशी मतदारसंघात मालाड (पूर्व) व गोरेगाव येथे एकमात्र अग्निशमन केंद्र असल्याने कुरार, आप्पापाडा येथे अरुंद रस्ते असल्याने अग्निशमन दलाच्या गाडय़ा पोहोचण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे कुरार व्हिलेज येथे मिनी फायर स्टेशन बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी अग्निशमनसाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या सुविधा 24 तास उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याचे अग्निशमन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

























































