मुखवटे सोलताना – वयम् मोठ्ठम् खोट्टम्!

>>मलिका अमरशेख

वाढत्या वयानुसार साक्षात्कार वाढत जातात. सत्याची फोळपटे फोल ठरावीत असेच हातात येत राहतात, काळाचा म्हातारा काठी आपटत राहतो.

व्यावहारिक जगात मोठ्ठय़ा वयाला मान असतो… ‘हे केस अशेच नाही पांढरे झालेत…’ पासून… ‘आमच्या काळात तं बघा…’ इथपर्यंत ऐकू येतं. 25 चा रौप्य महोत्सव फार नाही, पण हिरक – अमृत – असं चढत्या भाजणीत त्याची श्रेणी चढत जाते…

एेंशी गाठणारे कमीच…

सर विन्स्टन चर्चिलना 75 व्या वर्षीच्या शुभेच्छा देण्यासाठी तोबा गर्दी उसळलेली… एक पत्रकार आला. शुभेच्छा देत म्हणाला, ‘‘खूप शुभेच्छा, तुमच्या एWशीव्या वाढदिवसाला यायलाही माझी इच्छा आहे.’’ चर्चिल त्वरित म्हणाले त्याच्या खांद्यावर थोपटत… ‘‘का नाही मित्रा, तुझी तब्येत तर बरी दिसतेय मला!’’

तर मोठय़ा वयाच्या लोकांना अनेक स्थितीतून जावं लागतं… काही वेळा उपेक्षा काहीवेळा दुर्लक्ष काहीवेळा शारीख्याधींनी येणारं परावलंबित तर काहीवेळा आपण आयुष्य वायाच घालवलं असा जीवघेणा चरचरीत बिब्बा उतावा तसं आत्म्यावर, मेंदूवर जखमा देणारा विचार… तर काहींना आता आपण सर्वज्ञ झालोत असाही साक्षात्कार होऊन उपदेश. सल्ले… विचार – सुविचार – अंदाज आणि शेवटी समोरच्यानं काय केलं म्हणजे त्याचं आयुष्य बरं जाईल इथपासून ‘तुम्हाला सांगतो – अमेरिकेचं चुकलच…’’ आणि मग चीन-जपान, कोरियानं काय करायला हवं होतं इथपर्यंत उहापोह होतो.

संत एकनाथानं छान वर्णन केलंय-

‘‘दंताजीचे ठाणे उठले, कानपूर ते बंद जाहले

हस्तीपूरही कापू लागले…

ऐशी परगण्याची किर्ती बुढाली।’’

मोठे झालो की बालपणीचा काळ सुखाचा वाटू लागतो…

बालपणी मात्र सर्वात मोठं दुःख म्हणजे बाबा रागावले की भीती, आई रागावली की दुःख… मित्र भाव देत नाही… मास्तर किंवा टीचर सर्वांसमोर ओरडले किंवा पोटाला चिमटा काढून हातावर पट्टी मारली की…

त्यावेळी मार्क ही गोष्ट गौण होती, म्हणजे सापेक्ष!

मोठय़ांच्या घरात कमी मार्क ही भयंकर गोष्ट.

तर छोटय़ांच्या घरात ‘पोरगं साळत जातय् ह्येच मोठय़’!

असं तर काही छोटय़ांच्या छोटय़ा विश्वात गणित, इंग्रजी, संस्कृत ही दानव राक्षस कुळातले – तर काहींना लाल भोपळे मिळाले तरी ते कृष्णाच्या स्थितप्रज्ञतेनं घ्यायचे.

पण त्यावेळी मात्र मोठय़ांना असणारे फायदे लक्षात येऊन आपण कधी बरं मोठे होऊ कसं वाटायचे दिवस!

फुलपंखी निरागस… सगळे छान एकटे बाहेर जाणार… हवं ते खाणार. कुणी ओरडणारं नाही. आपल्याला मात्र ‘‘ताटात का टाकलं?’’ ‘‘एवढा वेळ बाहेर कुठं उंडारत होता?’’

‘‘अभ्यास करा अभ्यास…’’ ‘‘हात-पाय धुतलेस?’’

‘‘पा।़च रुपये? कशाला हवेत? घरात जे काय ते गिळायचं न् अभ्यासाला बसायचं?’’

‘‘बाळ, मार्क किती पडले तुला?’’ ‘इति पाहुणे-

नको ते बालपण… असं व्हायचं!

हळूहळू अचानकच ‘‘गाढवा, एवढा वाढला पण अक्कल नाही.’’ मंजे आपण वाढवाइतके वाढलो हे कळता कळता मोठेपणाचे तोटे कळू लागले… जबाबदारी- शिक्षण-नोकरीसाठी- नोकरी पोटासाठी – वाण्याची बिलं. विजेची बिलं… महागाई – पेपरमधल्या जाहिरातीची कात्रण – इंटरह्यू – आईचा त्रास – बाबांचं आजारपण – बहिणीचं लग्न – मोठेपणाबरोबर जबाबदारी – दायित्व – बांधिलकी – नात्यांचे बखेडे – समाजातल्या इष्ट अनिष्ट गोष्टींचे परिणाम – अवघड निर्णय घेण्याचं धर्मसंकट – सारंसारंच यात आलं – सामाजिक-राजकीय वर्तुळावरच भाष्य – सहभाग यावर घरातून होणारी टीका – भय – लग्नात अडकवून टाकण्याचे बेत आणि पुन्हा परत त्याच चाकोरीत अडकून वर्तुळातल्या यंत्रातला एक खिळा हेच भागधेय समजण्याचं हे वय –

नंतरच्या वयात गृहस्थाश्रम – नंतर वडिलांनी केलेलं नामकरण ‘गाढव’ हेच योग्य असल्याच अनेक ओझी अंगाखांद्यावर पडल्यानं होणारा साक्षात्काराचं वय-

– नंतर हळूहळू 70 नंबरची बस पकडता पकडता आपला स्पीड कमी होतो –

हळूहळू आपला स्टेटस् गल्लीतला दादा – ते रिक्षा ड्रायव्हर वाटून घेतात आणि आपण बाह्या सरसावून अरेला कारे म्हणून शकत नाही – आपला वर्ग लक्षात येतो – न् नामदेव ढसाळांची लाइन ‘‘तुही यत्ता कंची?’’ हेच आपलं नामाभिधान होतं ते वय -! – हळूहळू आपण बायकोआधीन होतो – न् ती सौभाग्यकांक्षिणी सुलज्जा… वगैरे वगैरे… चंडिका होऊन सर्व निर्णय व घराचा ताबा घेते –

त्यानंतर कुलदीपक व कुललष्म्या जे काय दिवे लावायचे ते लावतात. आपण फक्त निमित्त मात्र उरलोत ही जाणीव संध्याकाळी जाणवते…

कुलदीपक दिवे लावायला परदेशी प्रस्थान करतात –

कुलदिव्या दुसऱयांच्या घरी दिवे पेटवायला जातात –

आणि आता हातात – सोबती किंवा सोबतीणीचा हात आणि गेल्या वयाच्या आठवणीच राहतात –

न् मग – पार्कातल्या कट्टय़ावर काठी टेकवून संध्यासमयी समवयस्कांबरोबर मारलेल्या गप्पा – सुख-दुःखाची वाटणी – एकढंच काय ते ऐश्वर्य राहतं.

नंतरचं वय – नेमकं आपल्या हातात काय राहय़लं याचं? पैसे? नाती? कर्तृत्व? नाव? प्रसिद्धी? जनसंपर्क? आनंद? समाधान? कृतकृत्यता?

आपण कशासाठी जन्मलो ते आपण मिळवलं का? याचं उत्तर शोधतो आपण ते वय?

शेवटी जर तुम्ही वयाच्या साठी सत्तरीतही तुम्ही समाधानी व आनंदी व सकारात्मक आहात तर-

‘‘जगी सर्व सुखी असा मीच आहे!’’ असं तुम्ही रामदास स्वामींना उत्तर देऊ शकता!

[email protected]