पर्यावरणाच्या नावानं!!

>> मलिका अमरशेख

माणूस वीज निर्माण करतो तर उद्या हवा पण तयार करून तो ग्रह राहण्यायोग्य करेल! किंवा मग माणूसच असा तयार करतील की त्याला श्वासोच्छवासासाठी हवेची गरजच नसेल! एक कॅप्सूल गिळली की एक दिवसाची श्वसनक्रिया चालू!! आपण चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, पण आपण आपल्या निसर्गाकडे नाही पोचलो, ना दुसऱया माणसाच्या दुःखाकडे पोचलो!

नासाचं पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळावर उतरलं’ नुकतीच बातमी वाचली! चला, अजून एक ग्रह मिळाला बरं! चला चला… लवकर तिथं जाऊन तिथलीही हवा प्रदूषित करून टाकूया! पाणी संपवून टाकूया! जमिनी वाटून घेऊया… न् त्या वाटण्यावरून युद्धबिद्ध पण करून टाकूया…
मला तर उलटच वाटतंय की, आपण इथले नाहीच होत! आपण मूळ मंगळवासीच असावेत! तिथलं पाणी, हवा संपवूनच आपण नंतर पृथ्वी शोधली असावी! मंगळ समवर्णी आहे त्याचं मूळ कारण तिथं असताना आपण शेकडो लढाया शेकडो वर्षे लढलो न् त्या लढायातल्या सांडलेल्या रक्तानं मंगळ लाल झालाय!
– शास्त्रज्ञही हे मानतात… ‘अन्य पुरावे पाहता साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी तिथं नदीचा प्रवाह आणि त्रिभुज प्रदेश असावा… तसंच सूक्ष्म जीवही असावेत!’ पहा… अहो ते सूक्ष्म जीव आपणच असू कदाचित!
आपण आपल्या सुंदर पृथ्वीची बऱयापैकी वाट लावली आहे. प्रचंड जंगलतोड, बेसुमार पोल्युशन… उंदरानं पाव खाऊन टाकावा तसं आपण डोंगर कुरतडून टाकलेत, निसर्गाला वेठीला धरलंय, प्लॅस्टिकनं पृथ्वीचं नाक चोकअप करून टाकलंय… मोसम प्रदूषणाचा ऍनेस्थेशिया घेऊन बेहोशीत कधीही कुठेही जातायत…
आपण चंद्रावर गेलो, मंगळावर गेलो, पण आपण आपल्या निसर्गाकडे नाही पोचलो ना दुसऱया माणसाच्या दुःखाकडे पोचलो!
आपण कृत्रिम माणूस निर्माण केले ‘रोबोट’ – आपण क्लोनिंग करून सजीव माणूसही निर्माण केला, वीज निर्माण केली, असं करताना दुसरीकडे निसर्गाचा समतोलही बिघडवत गेलोय.
16 वर्षांची एक छोटी पोर ग्रेटा थुनबर्गनं कान पिरगाळले तरी आपण भानावर येत नाही. आपण समुद्राला मागं हटवलंय याचे परिणाम काय होतील याची सुतराम काळजी नाही कुणालाच. कोरोना आला, लॉक डाऊन जगभरात झालं म्हणून ओझोनचं छिद्र बुजलं. नाहीतर कोरोना नाही, पण स्किनच्या कॅन्सरनी मरण नक्कीच होतं.
आताही बरेच लोक असाच विचार करणारेत की, असं नाही तर तसं पण मरायचंच आहे तर खाऊन-पिऊन तरी मरुयात… कच्च्याबच्च्यांना उपाशी ठेवून कोणते आईबाप मुकाट राहतील?
याचाच एक धागा जोडून असंही आहे का की, ‘वुहान’मधून वटवाघूळ किंवा तत्सम जनावरापासून माणसाकडे आला, पण आपल्याकडे त्याचा संसर्ग फक्त माणसाकडून आलाय! बरं इथल्या वटवाघळांना अगर पशुपक्ष्यांना लागण झालेली नाही! हे एक अतार्किक आहे की, चीनमधल्या पक्ष्यांपासून तिथल्या माणसांना कोरोना झाला, पण माणसांपासून इथल्या पशुपक्ष्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. ईव्हन ज्यांना कोरोना झाला त्यांच्या घरातल्या पाळीव जनावरांना पण कोरोना झाल्याचं ऐकलं नाही, तर मग पशुपक्ष्यांची इम्युनिटी आपल्याहून स्ट्राँग आहे की आणि दुसरंच कारण आहे? सर्वसाधारणपणे मी तर खोकणारा कावळा न शिंकणारी चिमणी ऐकली नाही. आता तुम्ही म्हणाल की कुत्र्यांना ताप येतो, गाई, गुरं, कोंबडय़ा आजारी पडतात; तर असंय की हे पाळीव प्राणी आपण त्यांना काय वाटेल ते किंवा आपण खाऊ ते खायला घालतोय!
गाई तर प्लॅस्टिक पिशव्या खाऊन आजारी पडतात. निसर्गात पक्षी न् पशू हे निसर्गाचे नियम पाळतात म्हणून ते आजारी पडत नसावेत. हत्तीनं कधी ‘‘गवत खाऊन कंटाळा आलाय आज जरा मटण खाऊन संडे साजरा करावा’’ असं म्हटल्याचं ऐकलंय का? किंवा वाघानं ‘‘नाही बुवा… श्रावणात मी हरणाकडं बघत पण नाही’’ असं म्हटलंय का? तर खाणं आणि आरोग्य याचं गणित जे निसर्गानं जमवलंय ते आपण बिघडवायला बसलोय.
आणि आता दुसरे ग्रह शोधून आपण तेही बऱयापैकी प्रदूषित करणार न् अवकाशात असंख्य ग्रह आहेत आपल्या आकाशगंगेत – सुदैवानं (त्या ग्रहाच्या) त्यावर हवाबिवा काहीच नाही, पण सांगता येत नाही बुवा या माणसांचं!
माणूस वीज निर्माण करतो तर उद्या हवा पण तयार करून तो ग्रह राहण्यायोग्य करेल! किंवा मग माणूसच असा तयार करतील की त्याला श्वासोच्छवासासाठी हवेची गरजच नसेल! एक कॅप्सूल गिळली की एक दिवसाची श्वसनक्रिया चालू!!
खरं तर निसर्गात जीवनदायी संजीवन देणारी असंख्य झाडं आहेत, ज्यावर आयुर्वेद आधारित आहे. तर फक्त औषधी वनस्पती असणारी जंगलं प्रत्येक राज्यात, गावात, प्रदेशात आपण लावली पाहिजेत.
प्रत्येक गावात पडणाऱया पावसाचं पाणी अडवून साठवलं पाहिजे.
जंगलात राहणाऱया प्राण्यांचा अधिवास सुरक्षित केला पाहिजे. जेणेकरून ते अन्नासाठी आपल्या जागेवर येणार नाहीत. यासाठी आपण त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणं योग्य नाही.
लाकडाचा कमीत कमी वापर केला पाहिजे. इमारतीपासून अगदी कागदापर्यंत वारेमाप जंगलतोड होते. त्यासाठी पर्याय शोधले पाहिजेत.
आणि सर्वात शेवटी म्हणजे पिकांवर – फळांवर कीटकनाशक फवारणी न मारता दुसरा काही पर्याय आहे का तेही शोधायला हवंय. आपल्या पोटात अन्नाबरोबर विषही जातंय का हे पाहिलं तर आपणही जगू न् वसुंधरेलाही जगवू!
पर्यावरणाच्या नावाने चांगभलं!

malikaamarshekh1234 @gmail.com

आपली प्रतिक्रिया द्या