
सामना प्रतिनिधी । कवठे येमाई
शिरूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रांजणगाव गणपती येथून व शिरूरकडून मंचर, नारायणगाव, लेण्याद्री, ओझर, भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कवठे-ते मलठण रस्त्याची असंख्य खड्डे पडून चाळण झाली असून हा रस्ता त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी शिंदेवाडी येथील सामाजिक कार्यकते संताजी तिखोळे व प्रवाशांनी केली आहे.
मलठण पासून कवठे येमाई पर्यंतचा रस्ता अष्टविनायक मार्गामध्ये असून यासाठी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नाने रांजणगाव गणपती, सोने सांगवी , मलठण, कवठे येमाई मार्गे नारायणगाव ते ओझर लेण्याद्री रस्त्यासाठी मोठा निधी मंजूर झालेला आहे. मात्र हे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. या रस्त्याला खड्डे मोठ्या प्रमाणात पडले आहेत. यामुळे या रस्त्याने जाणारे प्रवासी व वाहनधारकांना खूपच हाल सहन करावे लागत आहेत. याबाबत संताजी तिखोळे, संजय शिंदे, संपत फुलसुंदर, दादा बोडरे, शशिकान्त वाव्हळ, संजय थोरात, अण्णा घुले, वैभव जाधव यांनी या रस्त्यांची त्वरीत दुरूस्ती करण्यांची मागणी केली आहे.
या रस्त्याने मोठ्या प्रमाणात शिरूर मलठण, कवठे येमाई मार्गे मंचर नारायणगाव पर्यंतची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. अनेक वाहनांना दूध, शेतमालासह गुजरात, सुरत, नाशिकला जाण्यांचा हा जवळ्चा मार्ग आहे. मात्र या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली असल्याने अनेकदा गाडया नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे हे खड्डे भरण्याचे काम करणार कोण? असा प्रश्न आता सर्व सामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.


























































