मालवण अंगणवाडीत सात महिने अंगणवाडी सेविकाच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

वायरी-भूतनाथ लुडबेवाडी येथील अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका हे पद गेले सात महिने रिक्त आहे. तरी तात्काळ अंगणवाडी सेविकेची नेमणूक करून मुलांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी सरपंच घनश्याम ढोके यांनी मालवणचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आली.

वायरी भूतनाथ लुडबेवाडी येथील अंगणवाडीतील अंगणवाडी सेविकेने आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद सुमारे सात महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे मुलांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी वायरी भूतनाथचे उपसरपंच संदेश तळगावकर, शिवसेना विभागप्रमुख प्रविण लुडबे, ग्रा. प. सदस्या सौ. शीला लुडबे, माधुरी खोबरेकर, रुपेश गोसावी आदी उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकेने पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदाचा भार हा अंगणवाडी मदतनीस यांच्यावर पडला आहे. एकट्या मदतनीसला मुलांवर लक्ष देणे शक्य होत नाही. त्यासाठी अंगणवाडी सेविका कार्यरत असणे आवश्यक आहे. दरम्यान, अंगणवाडी रिक्त पदे न भरण्याचे राज्य शासनाचे आदेश असले तरी कायमस्वरूपी अंगणवाडी सेविका भरती न करता पर्यायी अंगणवाडी सेविका भरती करण्यात यावी. जेणेकरून लुडबेवाडी अंगणवाडीची अडचण नवीन भरती प्रक्रिया होईपर्यंत दूर होईल. लवकरात लवकर तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी अंगणवाडी सेविका नियुक्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.