मालवण – भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पाचजण पॉझिटिव्ह

मालवण शहरात बुधवारी पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस बाबा परब याना कोरोनाची लागण झाली आहे. मालवणात कोरोना रुग्णसंख्या २६२ वर पोहोचली आहे. तर १९९ व्यक्ती बरे होऊन घरी परतले आहेत. तर तालुक्यात ९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

मालवण शहर परिसरात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत असून प्रामुख्याने व्यापारी वर्गाला कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी आढळून आलेल्या पाच कोरोना बाधितांमध्ये  दोन व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यातील एक चायनीज व्यावसायिक असून दुसरे मेडिकल व्यावसायिक आहे.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये देऊळवाडा येथे दोन रुग्ण मिळून आले आहेत. यात भटजींच्या एका कुटुंबात वडील आणि मुलाला कोरोनाची लागण झाली आहे.

भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस बाबा परब यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. परब यांनी स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये मी कोविड टेस्ट केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतः मुंबई येथून आल्यापासून होम क्वारंटाईन असल्याने माझ्या संपर्कात इतर कुणीही नाही. तरी माझी प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या