भाजपला हिरोपासून झिरो करावं लागेल – ममता बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकांआधी भाजपच्या विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सोमवारी कोलकाता येथे दाखल झाले. कोलकाता येथे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला हिरोपासून झिरो करण्यासाठी विरोधी पक्षांना एकजुटीने लढावं लागेल, असं म्हटलं आहे.

कोलकाता येथील नबान्न सचिवालयात ही बैठक पार पडली. या बैठकीत नीतिश कुमार म्हणाले की, जे लोक सध्या प्रशासन चालवत आहेत, ते फक्त प्रचार करत आहेत. ते देशासाठी काहीही काम करत नाहीयेत. सगळ्या पक्षांना एकत्र यावं लागेल, असं नीतिश कुमार यावेळी म्हणाले.

दरम्यान ममता बॅनर्जी यांनीही यापुढील भेट बिहार येथे व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. बिहार येथे जाहीर सभा घेण्यासही आपली काही हरकत नसल्याचं म्हणताना ममता यांनी संयुक्तरित्या काम करण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, बिहारमध्ये एक जाहीर सभा झाली तर सगळ्यांना हा संदेश जाईल की आपण सगळे एकसाथ आहोत. माझी इच्छा आहे की भाजप हा झिरो व्हावा. माध्यमांच्या सहकार्यामुळे आणि फेक व्हिडीओमुळे भाजप मोठा हिरो झाला आहे. त्याला हिरोपासून झिरो करावं लागेल, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.