सकाळच्या सुमारास कामावर निघालेल्या महिलांना लक्ष्य करत त्यांचा विनयभंग करून पसार होणाऱया एका विकृत तरुणाच्या नवघर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सुरेंद्र वंजारी (31) असे त्या विकृताचे नाव आहे.
ठाण्याच्या कोपरी येथील चेंदणी कोळीवाडय़ात राहणारा सुरेंद्र एका हॉटेलात कॅशियरचे काम करतो. एक 39 वर्षीय महिला 7 तारखेला पहाटे मुलुंड परिसरातून रिक्षाने कामावर जात होती तेव्हा स्कुटीवरून आलेल्या तरुणाने त्या महिलेच्या नको त्या अंगाला हात लावून त्यांचा विनयभंग केला आणि हसून निघून गेला. 18 तारखेला त्याच महिलेचा त्याने पुन्हा विनयभंग केला. आपल्याबरोबर तो पुन्हा आणखी काहीतरी करेल या भीतीने पीडित महिलेने अखेर मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून सपोनि संतोष धाडवे, सुरेश पाटील, शिवकुमार वाकचौरे, संतोष गुट्टे, मंगेश दंडगव्हाळ यांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी तरुण विनयभंग केल्यानंतर स्कुटीवरून सुसाट निघून जात असल्याने त्याला शोधणे जिकिरीचे झाले होते. पोलिसांनी 300 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून अखेर त्या आरोपीला कोपरी परिसरातून ताब्यात घेतले.
विवाहित असलेल्या सुरेंद्रने याआधीदेखील एका महिलेचा विनयभंग केला होता. त्या वेळी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. सुरेंद्र हाती लागल्याने विनयभंगाचे दोन गुन्हे उघडकीस आले असून त्याने अशा प्रकारे बऱयाच महिलांचा विनयभंग केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.



























































