
सामना ऑनलाईन, मुंबई
मौजेकरिता रात्रीच्या वेळेस सोसायटीमध्ये शिरून महागडय़ा सायकली चोरणाऱयाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. दिनेश सुगन दिवाकर असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 8 सायकली आणि 4 मोबाईल जप्त केले आहेत. बोरिवली परिसरात रात्रीच्या वेळेस सोसायटीमधून सायकली चोरीला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे यांच्या पथकाने तपासादरम्यान 4 ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा एकजण सायकल चोरून नेताना तो सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये दिसला. पोलिसांनी सापळा रचून दिनेशला बोरिवली परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सायकल आणि मोबाईल चोरीची कबुली पोलिसांना दिली.



























































