अंधाराचा फायदा घेऊन करायचा चोऱया करणाऱ्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधाराचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱया रिक्षाचालकाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. दिनेश चतुर्वेदी असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार हे बोरिवली येथे राहतात. एप्रिल महिन्यात ते जोगेश्वरी येथे नातेवाईकाच्या मुलीच्या साखरपुडय़ाला गेले होते. साखरपुडा आटपून ते बोरिवली रेल्वे स्थानकात आले. रिक्षाने ते भगवती रुग्णालयाजवळ आले. चालकाला पैसे देण्यासाठी ते खाली उतरले. त्यांचा मोबाईल रिक्षातच राहिला. अचानक रिक्षाचालक पळून गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी रिक्षाचा शोध घेतला. त्यांनी एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रभारी पोलीस निरीक्षक जयवंत मते यांच्या पथकातील उपनिरीक्षक अखिलेश बोंबे, जोपळे, परीट, देवकर, आहेर, शेरमाळे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये रिक्षाचा नंबर दिसला. त्यावरून पोलिसांनी त्या रिक्षाच्या मालकाचा शोध घेतला. त्याने ती रिक्षा दिनेशला भाडे स्वरूपात चालवण्यास दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दिनेशला बोरिवली परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

रिक्षात बसवून काढायचा वस्तू

दिनेश हा बीअर बारसमोर रिक्षा पार्क करायचा. जे कोणी व्यक्ती जास्त दारू प्यायले असतील अशांना तो रिक्षात बसवायचा. नशेत असलेल्या व्यक्तीच्या खिशातील पैसे आणि मौल्यवान वस्तू तो चोरी करत असायचा अशी त्याची गुह्याची पद्धत आहे.