
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीची मागणी करुन जिल्हा प्रशासनाकडे आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देऊन देखील कोणतीच कारवाई न केल्याने अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात वैजनाथ पावडे व गणेश ढोणे या दोन युवकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वेळीच दक्षता घेत या दोन्ही युवकांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
29 मे रोजी घोटा देवी येथील वैजनाथ पावडे व गणेश ढोणे या युवकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन नर्सी नामदेव येथील स्वस्त धान्य दुकानदार बी.आर.बाहेती व तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागातील एक कर्मचारी यांनी संगणमत करून एकाच योजनेचा दोन वेळा माल उचलून स्वस्त धान्याचा काळा बाजार केल्याची तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. कोणतीही चौकशी न केल्याने त्यांनी परत एकदा निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची कोणतीही दखल न घेता याकडे दुर्लक्ष केल्याने आज सदरील दोन्ही युवकांनी जिलाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी वैजनाथ पावडे रा. घोटा देवी व गणेश ढोणे या दोघांनी देखील एक कॅन भरून अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेऊन या दोघांना ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असुन या तरूणाना तात्काळ शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
























































