
सामना ऑनलाईन । पाटणा
विवाहीत महिलेसोबत दुसरं लग्न केल्याने एका विवाहीत पुरुषाला त्याच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात घडली आहे. श्रवण महतो असे त्या तरुणाचे नाव असून त्याचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
ओरहलिया गावात राहणाऱ्या श्रवणचे काही वर्षांपूर्वी एका महिलेशी लग्न झाले होते. मात्र विवाहीत असूनही श्रवण त्याच्याच गावातील दुखिया नावाच्या एका विवाहीत महिलेच्या प्रेमात पडला होता. तिच्यासाठी त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला सोडले व त्या महिलेशी पळून लग्न केले. त्यानंतर सहा महिने ते दोघेही गावा बाहेरच राहिले. मात्र नोव्हेंबरमध्ये श्रवण व दुखिया गावात परतले होते. त्यांनी गावाच्या पंचायतीला देखील त्यांना गावात परत घेण्यास सांगितले. मात्र पंचायतीच्या निर्णयाआधीच श्रवणच्या पहिल्या बायकोच्या नातेवाईकांनी त्याला बेदम मारहाण करत जिवंत जाळले. यात 70 टक्के भाजल्याने श्रवणचा मृत्यू झाला.

























































