नगरमध्ये बेवारस मृतदेह आढळण्याचे सत्र सुरूच, इमामपूर घाटात आढळला पुरुषाचा मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर-संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटात एका खड्डय़ामध्ये अंदाजे 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह गुरुवारी (दि. 12) सायंकाळी आढळून आला आहे. या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. या व्यक्तीचा कोणीतरी घातपात केला असावा, असा संशय पोलिसांना आहे. विशेष म्हणजे नगर परिसरात बेवारस मृतदेह आढळण्याची आठवडाभरातील ही पाचवी घटना आहे.

इमामपूर घाटात रस्त्याच्या कडेला असलेल्या कठडय़ाच्या खाली खोल खड्डय़ात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे व पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा मृतदेह अंदाजे 45 वर्षे वयाच्या पुरुषाचा असून, तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

नगर शहर परिसरात बेवारस मृतदेह आढळण्याचे सत्र सुरू असून, आठवडाभरातील हा पाचवा मृतदेह आहे. शेंडी परिसरातील वांबोरी फाटय़ानजीक तरुणाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह शनिवारी (दि. 7) आढळला होता. त्याचदिवशी खडकी येथेही एका युवकाचा बेवारस मृतदेह वालुंबा नदीच्या कडेला आढळून आला. त्यानंतर मंगळवारी (दि. 10) कुष्ठधाम रस्ता परिसरातील विहिरीत एका महिलेचा मृतदेह आढळला होता. बुधवारी (दि.11) इंदिरानगर वस्तीसमोर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.