
सामना प्रतिनिधी, मुंबई
व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या नावाखाली एका कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला 72 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. फसवणूकप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. गेल्या नोव्हेंबरला सायबर भामटय़ानी तक्रारदाराला एस.एम.एस. पाठवला होता. कंपनीच्या वतीने काही ठरावीक ग्राहकांनाच व्हीआयपी नंबर देण्याचे ठरवले आहे.
सवलतीच्या दरात हा नंबर दिला जाणार असल्याच्या भुलथापा भामटय़ांनी मारल्या. भामटय़ांनी एका खासगी मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवले. व्हीआयपी क्रमांकाकरिता तक्रारदारांना 72 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. पैसे जमा केल्यानंतर काही दिवस थांबावे लागतील अशा भुलथापा भामटय़ांनी मारल्या. पैसे भरूनही व्हीआयपी क्रमांक न मिळाल्याने तक्रारदार अखेर एका मोबाईल गॅलरीमध्ये गेले. गॅलरीमध्ये जाऊन व्हीआयव्ही क्रमांकाच्या सेवेकरिता विचारपूस केली तेव्हा कंपनीच्या वतीने असे मेसेज पाठवले जात नाहीत असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी त्या नंबरवर फोन केला असता तो फोन नंबर बंद असल्याचे निदर्शनास आले.





























































