
सामना ऑनलाईन । कोलकाता
पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे राहणाऱ्या एका नराधम पित्याने त्याच्या १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या नराधम बापाला अटक केली आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी गरोदर राहिली आहे. सदर मुलगी आता सहा महिन्यांची गरोदर असून तिला आता सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
पीडित मुलीची आई ही आठ महिन्यांपूर्वी दिल्ली येथे नोकरीनिमित्त गेली. तेथेच राहून ती घरकाम करून पैसे कमवायची. या महिलेच्या तीन मुली या त्यांच्या वडिलांसोबत सिलिगुडी येथे राहायचे. आईच्या गैरहजेरीचा फाय़दा घेत वडिलांनी सर्वात मोठ्या मुलीवर बलात्कार केला. तसेच याविषयी कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. महिनाभरापूर्वी जेव्हा सदर मुलगी उलट्या होतात म्हणून दवाखान्यात गेली होती त्यावेळी डॉक्टरांनी तिला ती गरोदर असल्याचे सांगितले. याबाबत तिने आपल्या आईला आणि काही मैत्रिणींना सांगितल्यानंतर पीडित मुलीचे वडील पळून भुटानला गेले होते. पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रॅक करून त्यांना भूटानच्या सीमेवरून अटक केली. याप्रकरणी त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

























































