
सामना प्रतिनिधी । राहुरी
राहुरी तालुक्यातील आंबी येथील वीस वर्षीय तरूण फारुक मन्सूर इनामदार याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. रमजान ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने आंबी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोबाईलमध्ये असलेल्या पबजी गेम खेळण्याचा नाद या घटनेला कारणीभूत ठरला असल्याची माहिती फारूकच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फारुक हा प्रवरा नदीकाठच्या करंजीच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. या घटनेची खबर मिळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. स्थानिक गावक-यांनी पोलिसांना खबर दिल्याने घटनास्थळी धाव झाडाला फास घेतलेल्या अवस्थेतील फारूकचा मृतदेह खाली घेऊन देवळाली प्रवरा औटपोष्ट पोलिसांनी पंचनामा केला. सायंकाळी राहुरी येथे शव विच्छेदना नंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. मोलमजुरी करणारा फारुक मोबाईल मधील पबजी गेममध्ये अडकला होता. तो आठ आठ तास मोबाईल गेम खेळत असल्याची माहिती फारूकच्या घरच्यांनी पोलिसांना दिली. रमजान ईदची नमाज अदा केल्यानंतर दुपारच्या वेळी तो घराबाहेर पडला होता. तासभरानंतर झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत फारूक आढळला.


























































