लाखोंची फसवणूक करून दीड वर्ष बेपत्ता झालेला अखेर सापडला

540

भाडोत्री असतानाही ती रूम दुसऱया व्यक्तीला 7 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर देऊन दीड वर्षापासून फरार झालेला आणि कुटुंबीयांनी मिसिंग तक्रार दिल्याने पोलीस ज्याचा इतके दिवस शोध घेत होते तो भामटा नालासोपाऱयात ताडदेव पोलिसांच्या हाती लागला.

हिमांशू येलिया (40) असे या भामटय़ाचे नाव आहे. ताडदेवच्या तुळशीवाडीत त्याची खोली आहे. ती खोली त्याने आधीच एकाला भाडय़ाने दिली आहे, मात्र तरीदेखील त्याने ही बाब लपवून पुन्हा तीच खोली 10 लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर खोली भाडय़ाने द्यायची असल्याचे सांगून भाडेकरू शोधू लागला. दिनेश यादव (50) याने ती खोली भाडय़ाने घ्यायची तयारी दाखवून 7 लाख हिमांशूला दिले. तसेच त्यांनी त्यानुसार करारपत्र देखील बनवले, पण प्रत्यक्षात त्या खोलीत भाडोत्री राहत असल्याचे समजताच दिनेशने त्याचे पैसे मागण्यास सुरुवात केली. दिनेश पैसे परत मागू लागताच हिमांशू परिसरातून गायब झाला. हा प्रकार सुरू असताना हिमांशूच्या कुटुंबीयांनी हिमांशू हरवला असल्याची तक्रार ताडदेव पोलिसांत दिली. दीड वर्षापूर्वीची ही घटना असून तेव्हापासून ताडदेव पोलीस हिमांशूचा शोध घेत होते.

वडिलांच्या अंत्ययात्रेला आला आणि लटकला

ताडदेवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फिरोज बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अरुण थोरात, पडवाळे, उपनिरीक्षक बजरंग जगताप तसेच मिटागरी, बोधे, हेरवडे, कांबळे, सांगळे, आव्हाड, फाळके हे पथक हिमांशूचा शोध घेत होते. दरम्यान, 8 तारखेला हिमांशूच्या वडिलांचे नालासोपारा येथे निधन झाले. त्यासाठी हिमांशू तेथे येणार असल्याची खबर ताडदेव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नालासोपाऱयात फिल्डिंग लावून दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या हिमांशूला पकडले. तो बेपत्ता होता तरी विविध मार्गानी कुटुंबीयांच्या संपर्कात होता असे समजते.

आपली प्रतिक्रिया द्या