
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये अवनी वाघीणीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी केला आहे. या वाघीणीची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने आपल्याला दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेबाबत त्यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्याचे वन आणि पर्यावरणमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसारच अवनीची हत्या करण्यात आल्याचे सांगत त्यांनी मुनगंटीवार यांच्यावरही टीका केली आहे. ही घटना अपराध असल्याचेही त्या म्हणाल्या. वाघीणीला जिवंत पकडण्याऐवजी तिला ठार करण्याचे आदेश देणे हे क्रूरतेचे लक्षण आहे, असेही त्या म्हणाल्या.
I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered in #Yavatmal, #Maharashtra. #Justice4TigressAvni https://t.co/hX6wuf62Ec
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
या नरभक्षक वाघीणीने जिल्ह्यात 13 जणांचे बळी घेतले आहेत. त्यानंतर या वाघीणीला जिवंत पकडण्याचे किंवा ठार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मुनगंटीवार यांनी असे आदेश अनेकदा दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार तिसऱ्या वाघाची हत्या करण्यात आली आहे. तसेच कोल्हा आणि अस्वल यांच्याह अनेक वन्य प्राण्यांना ठार करण्यात आले आहे. त्यांनी दिलेले हे आदेश क्रूर आणि अवैध आहेत. वनविभागाचे अधिकारी वाघीणीला बेशुद्ध करून तिला पकडण्यासाठी सक्षम असताना तिला ठार करण्याचे आदेश का देण्यात आले असा सवालही त्यांनी केला आहे. शूटर शाफत अली खान यांनाच असे आदेश का देण्यात आले असेही त्यांनी विचारले आहे. हा मुद्दा आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उपस्थित करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. वाघीणीला मारण्याचे आदेश दिल्यानंतर वन्यप्रमींकडून होणाऱ्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या. अवनीची हत्या करण्यात आल्याने आता तिच्या बछड्याचांही मृत्यू होईल. वन्यजीवांशी खेळ करणाऱ्या या आदेशाविरोधात आपण कायदेशीर आणि राजकीय लढाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

























































