मोदींचे मौनपूर! अवघ्या 36 सेकंदांत संपली प्रतिक्रिया आणि आता राजस्थानला प्रचाराला चालले

मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मौनपूर सुरू आहे. 77 दिवसांनंतर मगरीचे अश्रू ढाळावेत तशी अवघ्या 36 सेकंदांची प्रतिक्रिया मोदींनी गुरुवारी दिली. त्यानंतर आज संसदेत मोदींकडून निवेदनाची मागणी होत असताना मोदींना मात्र राजस्थान दौऱयाचे वेध लागले आहेत. सिकर येथे 27 जुलै रोजी मोदींची जाहीर सभा होणार असून या सभेत ते प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

हिंसाचाराचे 150 बळी

मणिपूरमध्ये आरक्षणाच्या मुद्दय़ावरून 3 मे 2023 पासून मैतेई आणि कुकी समुदायांत जातीय हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत 150 लोकांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे, तर 37 लाख लोकांना या हिंसाचाराचे चटके बसले आहेत. त्यांचे संसार उघडय़ावर आले आहेत.

पंतप्रधान बोलले, पण त्यातही राजकारण केले!

मणिपूरवर 77 दिवस पंतप्रधानांनी चकार शब्द काढला नाही. अमानुष घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर नाइलाजाने पंतप्रधान एक वाक्य बोलले. त्यातही ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत त्यांची नावे घेऊन त्यांनी राजकारण केलेच- प्रियांका गांधी

तासन्तास मन की बात करतात पण…

तासन्तास ‘मन की बात’ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपूरवर केवळ 36 सेकंद बोलले. ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा देणाऱयांच्या राजवटीत लेकींची दिवसाढवळय़ा धिंड काढली जात आहे. याचा मी निषेध करतो- सत्यपाल मलिक