मणिपूर हिंसाचारप्रकरणी सीबीआयने दाखल केल्या 6 FIR, 10 जणांना अटक

manipur-violence

मणिपुरात उसळलेला हिंसाचार, महिला आणि सर्वसामान्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल तिथली जनता 2 महिने टाहो फोडत असताना आणि विरोधक इथे केंद्रीय यंत्रणांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करत असताना ढिम्मपणे पाहणाऱ्या सीबीआयने आता वेगाने हालचाली करायला सुरुवात केली आहे. सीबीआयने हिसाचाराप्रकरणी 6 एफआय़आर दाखल केल्या आहेत. आतापर्यंत सीबीआयने 10 जणांना अटक केली असून सातवी एफआयआर लवकरच दाखल केली जाईल असे सांगण्यात आले आहे.

गेले 86 दिवस मणिपूर हिसाचाराच्या आगीत जळत आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र करून धिंड काढण्यात आली आणि नंतर त्यांच्यावर सामूहीक बलात्कार करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मणिपूरमध्ये या घटनेव्यतिरिक्त आणखीही काही महिलांवर अत्याचार करण्यात आले असून त्यातील काहींचे खून करण्यात आल्याचा आरोप समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे. यातील दोन महिलांना निर्वस्त्र
धिंड काढणे आणि सामूहीक बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. निश्चित कालमर्यादेत या प्रकरणाची सुनावणी व्हावी यासाठी हा खटला मणिपूरच्या बाहेर चालवण्यात यावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.

मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी गृहमंत्रालयाने हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुकी आणि मैतेई जमातीच्या प्रमुख नेत्यांशी संपर्क साधण्यात सुरूवात केली आहे. दोन्ही जमातींच्या नेत्यांना एका मंचावर आणून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या आठवड्यात मणिपूरमधला एका व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जात आहे असं दिसलं होतं. या महिलांवर नंतर सामूहीक बलात्कार करण्यात आल्याचं उघड झालं होतं. यातील एका महिलेच्या भावाने विरोध केला असता त्याला जमावाने ठार मारले होते. 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने या घटनेची स्वत:हून दखल घेतली होती.