
>> डॉ. मंजिरी भालेराव
[email protected]
जुन्नर परिसरातील मानमोडी डोंगरात असलेल्या तीन लेणीसमूहांपैकी एका वेगळ्याच नावामुळे लक्षात राहणारी शैलगृहे म्हणजे भूत लेणीसमूह. या समूहातील चैत्यगृहाचे मुखदर्शन आणि कोरीव काम इतर लेण्यांपेक्षा वेगळे आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाचे म्हणजे जुन्नरचे शिवनेरी किल्ल्याबरोबरच अजून एक महत्त्व आहे. ते म्हणजे या नगराभोवती असलेल्या टेकडय़ांमधील किंवा डोंगरांमधील शैलगृहे. या परिसरात भारतातील सर्वात मोठा शैलगृहसमूह आहे. साधारणपणे 183 पेक्षा जास्त मानवनिर्मित लेणी या परिसरात आहेत. त्यामध्ये मानमोडी डोंगरात तीन लहान-लहान समूह आहेत. त्यांची नावे आहेत भीमाशंकर, आंबा-अंबिका आणि भूत लेणी. अर्थातच ही नावे काळाच्या ओघात स्थानिक लोकांनी दिली आहेत, पण या समूहांमध्ये असलेल्या शिलालेखातून या डोंगराचे नाव कळते, ते म्हणजे ‘मानमुकुट.’ आजचे ‘मानमोडी’ हे नाव याच ‘मानमुकुट’ या नावचा अपभ्रंश आहे. हे नाव या डोंगराला देण्यामागे नेमके काय कारण होते हे आज सांगणे जरी अवघड आहे. कदाचित त्या वेळेस जुन्नरमध्ये असलेल्या एकूण शैलगृहांमध्ये तीन महत्त्वाचे लेणीसमूह असल्याने त्यांचा मुकुटमणी असा हा डोंगर, असा अंदाज लावता येऊ शकतो, पण हा केवळ अंदाजच आहे. असे असले तरी कमीत कमी 2000 वर्षांपूर्वी या डोंगराचे नाव काय होते हे आज आपल्याला समजले आहे हीसुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे.
अशा या मानमोडी डोंगरात असलेल्या तीन लेणीसमूहांपैकी एका वेगळ्याच नावामुळे लक्षात राहतो तो म्हणजे भूत लेणीसमूह. भूत म्हटले की, जशी माणसाची भीती वाढते तशीच उत्सुकताही जागृत होते. बुद्ध लेणी या नावाचा अपभ्रंश होऊन हे नाव तयार झाले असावे. याचे अजून एक नाव प्रचलित आहे ते म्हजे ‘भूत लिंग.’ चैत्य कमानीच्या सर्वात वरच्या भागात कोरलेले नाग आणि गरुड यांना लोक भूत समजत होते व त्यांच्या शेजारी असलेल्या स्तूपला लिंग. त्यामुळेही याला भूत लिंग असे नाव पडले असे स्थानिक लोक सांगतात. अशा विविध गोष्टी जोडून ही नावे स्थानिक जनतेने तयार केली असावीत. हे सगळे चालू असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, या लेणी परिसरातून बौद्ध भिक्षू आणि उपासक जेव्हा दूर निघून गेले होते, तेव्हा या लेणी कोणासाठी केल्या होत्या, त्यांचा उपयोग काय आणि त्यात काय आहे हे स्थानिक लोकांना कळेना म्हणून त्यांनी आपापल्या परीने ही नावे देऊन त्यांचे स्पष्टीकरण तयार केले आणि पुढे ते रूढ झाले. त्यावर कधी कोणीही आक्षेप घेतला नाही. कारण तो घेणारे लोकही तेव्हा तिथे राहत नव्हते.
एकंदरीत पश्चिम महाराष्ट्रातील चैत्यगृहांच्या मुखदर्शनाचा आढावा घेत असताना त्यात अनेक प्रकार दिसून येतात, पण या समूहातील चैत्यगृहाचे मुखदर्शन आणि कोरीव काम हे काही वेगळेच आहे असे आपल्याला लक्षात येते. जरी याच्या दरवाज्याजवळचा भाग तुटला असला तरी त्याच्या वरती चैत्य कमानीजवळ बरेच शिल्पकाम दिसते. सर्वात वरच्या बाजूला लहान आणि मोठय़ा चैत्य कमानींनी सजावट केलेली आहे. त्याच्या खाली दोन स्तूप आणि चैत्यगवाक्षाच्या निमुळत्या टोकाच्या शेजारी एक पाच फण्यांचा नाग व त्याच्या विरुद्ध बाजूला मानवाच्या रूपातील गरुड कोरला आहे. त्यांच्या हातात चौरी आहे. जन्मजात शत्रुत्व असलेले हे दोन वैरी बुद्धाच्या स्मारकावर मात्र आपले वैर विसरून सेवेसाठी उभे आहेत, हे यातून दर्शवले गेले आहे. नागाच्या खालच्या बाजूला फुलांचे हार घातलेला एक (बोधी) वृक्ष कोरला आहे. चैत्य गवाक्षाच्या आतल्या बाजूला अर्धगोलाकार कमळासारखे कोरीव काम आहे. त्यात कमळाच्या पाकळ्यांसारखे नक्षीकाम आहे. त्या पाकळ्यांच्या आत मधोमध अभय मुद्रेतील लक्ष्मी उभी आहे. तिच्या दोन्ही बाजूस कमळावर उभे असलेले हत्ती आहेत. त्यांच्या सोंडेत पाण्याचे घट आहेत. लक्ष्मीला त्या पाण्याने अभिषेक होणार आहे असे त्यातून सूचित केले आहे. सृजनता आणि समृद्धीचे प्रतीक असलेली पृथ्वी म्हणजे लक्ष्मी व तिच्यावर पावसाचा अभिषेक करणारे हत्तीरूपी मेघ, हे रूपक दर्शविणारी, कोणत्याही धर्मांच्या सीमेपलीकडे असलेली, आज गजलक्ष्मी नावाने प्रसिद्ध असलेली देवी अनेक बौद्ध शैलगृहांमध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहिलेल्या पितळखोरा आणि ठाणाळे इथेही ठळकपणे तिचे अंकन पाहायला मिळते. तसेच समृद्धीची कामना करणारे व्यापारी हे दानकर्ते असल्याने अशा स्थापत्यावर असे गजलक्ष्मीचे शिल्प असले तर नवल नाही.
या गजलक्ष्मीच्या दोन्ही बाजूला एक स्त्राr आणि एक पुरुष नृत्य करताना दाखवले आहेत. त्यांच्या खालच्या मोकळ्या जागेत ‘यवन चद (चंद्र) याने गभदार (गृहद्वार) याचे दान दिले आहे,’ असा ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेत लेख कोरलेला आहे. हा यवन म्हणजे ग्रीक माणूस बौद्ध धर्माचा मोठा भक्त असावा असा निष्कर्ष आपण काढू शकतो. चैत्यगृहाच्या पुढच्या बाजूच्या शिल्पांच्या निर्मितीचे श्रेयसुद्धा यालाच द्यावे लागेल, पण त्याचे नाव मात्र चंद्र म्हणजे भारतीय आहे. कदाचित त्याच्या आधीची पिढी भारतात वास्तव्यास आलेली असावी.
शेजारी दुमजली विहार आहे. त्याची जरा पडझड झाली आहे, पण जे कोरीव काम शिल्लक आहे त्यावरून तिथे अतिशय सुबक रीतीने कोरलेले एक धर्मचक्र होते असे लक्षात येते. याशिवाय विहाराच्या दरवाजांच्या वरचा भागात त्रिरत्न, श्रीवत्स अशा प्रकारची शुभचिन्हेही कोरली आहेत, पण यांच्या आतील भिंती मात्र तुटल्या आहेत. येथील एका पाण्याच्या टाक्यावर एक शिलालेख आहे, पण त्याच्या अस्पष्टतेमुळे त्याचे वाचन होऊ शकले नाहीये.
इथे गेल्यावर मधमाश्यासून काळजी घेणे आवश्यक आहे. मधमाश्यांची खूप मोठी पोळी इथे लटकलेली असतात. त्या कधीही अंगावर येऊ शकतात. त्यामुळे मधमाश्यांना घाबरून इथे जाणे टाळण्यापेक्षा योग्य ती सुरक्षेची तजवीज करूनच इथे जाणे योग्य राहील. जुन्नर परिसरातील शैलगृहांमध्ये असलेल्या अनेक महत्त्वाच्या शैलगृहांमध्ये याचा समावेश होतो. एका यवनाने दिलेले दान आणि येथील अनोखे शिल्पकाम म्हणूनही या स्थळाचे वेगळे महत्त्व आहे.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)































































