
कंडोम बनवणाऱ्या मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीने आज भांडवली बाजारात दिमाखदार प्रवेश केला आहे. आयपीओ लागलेल्या गुंतवणूकदारांची चंगळ झाली असून अवघ्या तासाभरात गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. मॅनकाइंड फार्माचा शेअर आज मंगळवारी भांडवली बाजारामध्ये इश्यू प्राईजच्या तुलनेत तब्बल 20 टक्के अधिक दराने लिस्ट (सूचीबद्ध) झाला. लिस्टिंगनंतरही यात तेजी पाहायला मिळत असून बातमी लिहीपर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना 27 टक्के परतावा दिला होता.
मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीचा शेअर आज बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाला. दोन्हीकडे हा शेअर 20 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला असून 1080 किंमत असणारा शेअर 1300 वर गेला. त्यानंतरही यात वाढ दिसून आल्याने गुंतवणूकदारांना आतापर्यंत 280 रुपयांचा नफा झाला आहे.
गुंतवणूकदारांच्या उड्या
मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीचा आयपीओ बाजारात येताच गुंतवणूकदारांनी खरेदीसाठी उड्या घेतल्या. शेवटच्या दिवशी या कंपनी तब्बल 15.32 ओव्हरसबस्क्राईब झाला. 1026 ते 1080 रुपये प्रति शेअर किंमत असलेला हा आयपीओ 25 एप्रिलला उघडला होता आणि 27 एप्रिलला बंद झाला. आज 9 मे रोजी तो भांडवल बाजारात लिस्ट झाला.
सर्वात मोठा आयपीओ
दरम्यान, देशातील चौथी सर्वात मोठी फार्मा कंपनी असणाऱ्या मॅनकाइंड फार्माचा (Mankind Pharma) 4326 कोटींचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित होता. कंपनीचे प्रवर्तक आणि भागधारकांनी 4 कोटींहून अधिक शेअर्स विक्रीला काढले होते. यंदाच्या वर्षातील हा सर्वात मोठा आयपीओ होता. लिस्ट होण्यापूर्वी ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचा शेअर 110-113 रुपयांच्या प्रीमियमसह उपलब्ध होता.
कंपनीची उत्पादनं
मॅनकाइंड फार्मा (Mankind Pharma) कंपनीचे जवळपास 36 ब्रँड आहेत. मॅनफोर्स कंडोम, गर्भधारणा चाचणी किट, प्रेगा न्यूज आणि गर्भनिरोधक ब्रँड अनवॉन्टेड -72 या ब्रँड नावाखाली कंपनी उत्पादने विकते. कंपनी अँटासिड पावडर (गॅस-ओ-फास्ट), व्हिटॅमिन आणि मिनरल सप्लिमेंट्स (हेल्थ ओके ब्रँड) आणि अँटी-एक्ने तयारी (ऍक्नेस्टार ब्रँड) यासारखी आरोग्यसेवा उत्पादने बनवते आणि विकते.


























































