
सामना प्रतिनिधी । पणजी
दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक कोण लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी पर्रिकर यांचा मुलगा उत्पल याचे नाव चर्चेत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांना पर्रिकर यांचा राजकीय वारसा चालवण्याची विनंती केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिल्यामुळे पणजीच्या उमेदवारीसाठी उत्पलच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे.
स्वर्गीय मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या दोन्ही मुलांनी भारतीय जनता पक्षाचे काम करावे, अशी विनंती भाजपने दोन्ही मुलांना केली आहे. उत्पल व अभिजात हे पर्रिकर यांचे दोन्ही मुलं विवाहि आहेत. पर्रिकर यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या पहिल्या भेटीत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश खन्ना यांनी तुम्ही पर्रिकर यांच्याप्रमाणेच भाजपचे काम करावे, अशी विनंती त्यांना केली. ही माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पर्रिकर यांचा मुलगा पणजी मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढवणार आहे काय? असे पत्रकारांनी विचारताच, तेंडुलकर म्हणाले की तसा कोणताच विषय झालेला नाही. फक्त पक्षाचे काम करावे एवढीच विनंती खन्ना यांनी केली आहे. वडिलांनी जसे भाजपचे काम केले, तसेच मुलांनीही ते सुरू ठेवावे, अशी विनंती खन्ना यांनी केली. ती विनंती मान्य करावी की फेटाळावी हे ठरवण्यासारखी स्थिती नव्हती.
























































