
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. मराठा आरक्षणासाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना कळकळीचं आवाहन केलं आहे. तुमचा मान राखून घोटभर पाणी पितो पण जाळपोळ करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी राज्यभरातील मराठा आंदोलकांना केलं आहे.
आंदोलनात जाळपोळ करणारे लोक सामान्य नागरिक असतील असं आपल्याला वाटत नसून सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी यावेळी केला. अशी जाळपोळ झाल्यास आपला निर्णय बदलणार असल्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. कुठेही जाळपोळ झालेली माझ्या कानावर येऊ देऊ नका. तुमचा मान राखून मी घोटभर पाणी पितो पण जाळपोळ करू नका, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे.
आपली वैद्यकीय तपासणी करू देणार नसल्याच्या मुद्द्यावरही जरांगे पाटील ठाम असल्याचं यावेळी म्हणाले. आपण राजकीय लोकांना आपल्या दारात येऊ देत नाही, तुम्ही त्यांच्या दारात जाऊ नका, असं आवाहनही जरांगे यांनी केलं.
























































