जरांगे यांची तब्येत खालावली, मुंबईत उपोषण करण्यावर ठाम; सरकारला दिले आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती आज आणखी खालावली. त्यामुळे बुधवारी त्यांना पाटोद्यातच मुक्काम करावा लागला. तत्पूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांनी मुंबईत जाण्याचा निर्धार बोलून दाखवला. शुक्रवारपासून मुंबईत माझे उपोषण सुरू होईल. हिंमत असेल तर विरोध करून बघाच, असे आव्हानच त्यांनी दिले.

मराठा आरक्षणासाठी मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करण्याचे मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार जरांगे यांचा ताफा मंगळवारी अंतरवालीहून बीडकडे रवाना झाला. प्रचंड गर्दी आणि रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आल्याने पाटोद्यात पोहोचण्यासाठी त्यांना बुधवारची पहाट उजाडली. पहाटे अडीच वाजता त्यांची जाहीर सभा झाली. 18 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण, प्रवासाची दगदग यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण घटले. डॉक्टरांनी तपासणी करून अतिदक्षता विभागात उपचार घेण्याची सूचना केली. परंतु ही सूचना जरांगे यांनी धुडकावून लावली. त्यामुळे मराठा कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची सूचना केली. ही सूचना मान्य करून जरांगे यांनी सलाईन घेतले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

पोलिसांनी मागितली माहिती

आझाद मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिसांनी दोनदा फेटाळला. त्यामुळे तिसऱयांदा अर्ज करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी किती गाडय़ा, किती लोक येणार, त्यांची नावे अशी माहिती मागवली. त्यावर, आमच्या फक्त 7 ते 10 गाडय़ा आणि मोजकीच माणसे येतील, असे जरांगे यांनी सांगितले.

मला गोळ्या घालण्याचा सरकारचा प्लान

जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. सरकारला मला गोळ्या घालायच्या आहेत. पण मरणारच असेन तर मुंबईत जाऊन मरेन, त्यासाठी मला जाऊ द्या, असे जरांगे म्हणाले. आता सरकारने ड्राफ्ट पाठवला आहे. तो वाचून नंतर काय ते सांगतो. सरकारचे मंत्री पाटोद्यात येणार असल्याचे कळले आहे. पण ठोस काही असेल तरच या, असेही जरांगे यांनी बजावले.

सरकार मराठय़ांना सापत्न वागणूक देत आहे. मागण्या मान्य झाल्याचे सांगतात आणि दुसरीकडे प्रमाणपत्र रद्द करतात. सरकारने पोरखेळ चालवला आहे. आता हे खपवून घेणार नाही. मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबईतून माघार नाही.

  • जरांगेंना आंदोलनाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी करणारी याचिका एमी फाऊंडेशनच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या गुरुवारी सुनावणी होऊ शकते.