
पत्रकारांना उतारवयात आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच या योजनेतील अटींमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी लवकरच बैठक आयोजित केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे 2021 आणि 2022 चे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे प्रदान करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांस मदत करण्याच्या उद्देशाने स्थापन शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी समितीचे पुनर्गठन तसेच अधिस्वीकृती समितीचा लवकर शासन निर्णय काढला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सन 2021 चा कृ.पां. सामक राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, तर 2022चा ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांना प्रदान करण्यात आला.
दै. ‘बीड रिपोर्टर’चे शेख रिजवान शेख खलील आणि ‘न्यूज 18 लोकमत’चे विलास बडे, दै. ‘भास्कर’चे विनोद यादव यांना सन 2021चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले. सन 2022 चा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. ‘पुण्यनगरी’चे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अविनाश भांडेकर, ‘साम टीव्ही’ मुंबईच्या रश्मी पुराणिक, दै. ‘पुण्यनगरी’चे किशोर आपटे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, कामगार मंत्री सुरेश खाडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईपह्डे आदी उपस्थित होते.





























































