
सामना प्रतिनिधी । महाकवी कालिदास नाटयगृह, मुलुंड
नाटय़संमेलनाच्या नेहमीच्या पायवाटेवरून न जाता फक्त आणि फक्त प्रेक्षकांची अभिरुची ओळखून नियोजित केलेल्या ९८ व्या नाटय़संमेलनाचे हाऊसफुल्ल असे केवळ एका शब्दात वर्णन करता येईल. सलग ६० तास रंगलेल्या या महानाटय़ाने गर्दीचा विक्रम मोडीत काढला. पहाटेच्या प्रात: स्वर मैफलीपासून उत्तररात्रीच्या लोककलांच्या जागरापर्यंत प्रत्येक कार्यक्रमाचा रसिकांनी भरभरून आस्वाद घेतला. आम्ही नाटकवेडे आहोत हे मराठी माणसांनी दाखवून दिले.
कोकणच्या मातीत रुजलेल्या आणि कोकणी माणसाच्या अंगात मुरलेल्या अस्सल दशावताराची झिंग काय असते हे जाणून घेण्याची पर्वणी रसिकांना नाटय़संमेलनात मिळाली. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले नाटय़गृह आणि टाळ्या, शिट्टय़ांच्या गजरात पहाटे तीनच्या सुमारास सुरू झालेला दशावताराचा खेळ असा रंगला की रसिकांना वेळेचे भानच राहिले नाही. नाटय़संमेलनात दशावतारासह झाडीपट्टी, दंडार, आराधी या लोककलांचा जागर करून त्यांना पुन्हा लोकाश्रय मिळवून देण्याचा प्रयोग शंभर टक्के यशस्वी ठरला.
नाट्यसंमेलनाची दुसरी रात्र लोककलेला वाहिलेली होती. कुडाळच्या कवठी गावातील बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी मंडळाने भीष्मप्रतिज्ञा नाटक सादर केले. पांडवांचे युद्ध सुरू असताना युद्धाच्या नवव्या दिवशी दुर्योधन आणि शकुनीमामा मिळून भीष्माचार्यांवर आरोप करतात की, तू एकाही पांडवाला ठार केलेले नाही. त्यावेळी भीष्म प्रतिज्ञा करतात की, युद्धाच्या दहाव्या दिवशी सूर्योदयापासून एकाही पांडवाला पृथ्वीवर पाय ठेवू देणार नाही आणि स्वत: मरणशय्येवर जाणार त्या रात्री कृष्ण भीष्माचार्यांची भेट घेतो आणि त्यांना प्रतिज्ञा मोडण्याची विनंती करतो. पण ती प्रतिज्ञा न मोडता भीष्माचार्य कृष्णालाच युद्धामध्ये शस्त्र धरण्यास भाग पाडण्याची दुसरी प्रतिज्ञा घेतात असे भीष्मप्रतिज्ञाचे कथानक होते. पप्पू नांदोस्कर, काका कलिंगण, सुधीर हळदणकर, विनय गोंदकर, नीळकंठ सावंत, आनंद कोरगावकर, अनिल धावणकर, दत्तप्रसाद शेणई, शिवप्रसाद मेस्त्री, संजय गोठोसकर या कलाकारांनी दशावतार सादर केला. बाळकृष्ण गोरे पारंपरिक लोककला दशावतारी मंडळाने केरळ, थिरुवनंतपुरम, पंजाब येथेही लोककला पोचवली आहे.
‘लोककला जागर’ कार्यक्रमाचा समारोप नमन या कलाप्रकाराने झाला. ‘कोकणचा बाज संगमेश्वरी साज’ हा कार्यक्रम रत्नागिरीतील सुनील बेंडखळे आणि मंडळींनी सादर केला. रत्नागिरीच्या बोलीभाषेला विनोदाची फोडणी देत प्रेक्षकांना पोट धरून हसवले. जाखडी आणि इतर लोककला प्रकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
दंडार
भंडारा जिह्यातील सर्वसमावेशक लोककला या संस्थेने दंडार हे लोकनृत्य सादर केले. यामध्ये महिषासुराचा वध ही कथा मांडण्यात आली. यामध्ये सर्व पुरुष कलाकार होते. त्यांनीच स्त्री व्यक्तिरेखा साकारल्या. थोडा नाटय़प्रवेश आणि थोडे नृत्य असे दंडारचे सादरीकरण झाले. काठीच्या तालावर धरलेला अचूक ठेका बघून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकला.
झाडीपट्टीतून मांडले दाहक वास्तव
‘झाडीपट्टी’ हे नाव अनेकदा कानावरून गेले, पण झाडीपट्टी नेमकी काय असते हे अनेकांना ठाऊकच नाही. वैदर्भीय संस्कृतीचे महत्त्वाचे अंग असलेली झाडीपट्टी रंगभूमी अलीकडच्या काळात प्रकाशझोतात आली. या कलाप्रकाराची ओळख करून देण्यासाठी झाडीपट्टीचा प्रयोग संमेलनात आयोजित करण्यात आला. रात्रभर मोकळ्या जागेत झाडीपट्टीची नाटकं होतात.नाटय़संमेलनात ‘फाटका संसार’ हे नाटक सादर झाले. शेतकरी आत्महत्या आणि त्यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबं यांची कथा नाटकातून मांडण्यात आली.


























































