खोट्या अॅट्रॉसिटी गुन्ह्यामुळे ग्रामस्थ संतापले, पोलीस ठाण्यासमोर केलं आंदोलन

114

सामना प्रतिनिधी । नगर

सोनेवाडी येथे एका महिलेने सरपंचाचा पती आणि अन्य दोघांनी विनयभंग केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींनी या महिलेविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे ग्रामस्थ संतापले असून पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या विरोधात त्यांनी गुरुवारी आंदोलनही छेडले आहे.

नगर येथील एका भगिनीशी गावच्या सरपंच महिलेचा पती सुरेश चांदणे व दोघांनी अश्लील वर्तन, विनयभंग करून तिला मोबाईल वरून फोन करून लज्जास्पद शब्द वापरले. म्हणून सदर आशाताई सेविकेने नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये सरपंच महिलेचा पती सुरेश चांदणे व नवनाथ बेरड, गुलाब बेरड यांचे विरोधात रितसर फिर्याद नोंदवली.

सदर फिर्याद नोंदवतानाही नगर तालुका पोलीसांनी सुरुवातीस टाळाटाळ करत अखेर रात्री साडेआठ वाजता पोलीस स्टेशनला गेलेल्या महिलेची फिर्याद पहाटे तीन वाजता नोंदवून घेतली. आरोपींना तात्काळ अटक करण्या ऐवजी त्यांना क्रॉस फिर्याद नोंदविण्यासाठी नगर तालुका पोलीसांनी जाणीवपूर्वक संधी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

तसेच दुसऱ्या दिवशीही आरोपींना अटक झाली नाही उलट सुरेश चांदणे या आरोपीची सरपंच पत्नी मोनिका चांदणे हिने आशाताई सेविकेस, तसेच तिचे सासरे, पती, नातेवाईक व काही ग्रामस्थ, अशा नऊ जणांवरच ॲट्रॉसिटी कायद्यान्वये फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याची पायमल्ली करत पीडित महिला व तिच्या नातेवाईकांवरच गुन्हा दाखल केल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. तसेच पोलीस यंत्रणांवर विशिष्ट समाजाचा दबाव येत असल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या घटनेचा निषेध म्हणून शिवप्रहार संघटनेचे संस्थापक व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील यांनी सोनेवाडी गावास ४ जुलै रोजी भेट देऊन पीडित महिला व तिचे कुटुंबीय, तसेच ग्रामस्थ यांचेवर झालेल्या अन्यायाबाबत व्यथा जाणून घेतली. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. आम्हाला कोणत्याही कायद्याचे कवच नाही म्हणून काय आम्ही आमच्या समाजातील महिला-मुलींची इभ्रत वाऱ्यावर सोडायची काय काय?, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी यावेळी चर्चेदरम्यान उपस्थित केला. आवाज उठवला नाही तर उद्या प्रत्येक घरातील महिला भगिनींची अशा जात्यांध घटकांकडून बेईज्जती केली जाईल, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सोनेवाडी (पिंपळगाव लांडगा) येथे ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे धरणे आंदोलन करून न्याय मागितला. या आंदोलनात महिला, मुले-मुली, आबालवृद्धांसह ॲट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराने पीडित सर्व जाती धर्मीय समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या