मराठा आरक्षणासाठी आज ‘पंढरपूर बंद’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणास बसले आहेत. या उपोषणाला पाठिंबा म्हणून पंढरपूर मराठा महासंघाच्या वतीने उद्या (दि. 28) रोजी एक दिवसीय बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला मराठा संघटनांसह इतर संघटनांनी, व्यापाऱयांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांनी केले आहे.

मराठा समाज आरक्षणासाठी रविवारी पंढरपूर येथे मराठा महासंघाची बैठक झाली. या बैठकीत उद्या ‘पंढरपूर बंद’बाबत निर्णय घेण्यात आला. ‘बंद’च्या निर्णयाबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना निवेदनही देण्यात आले आहे.

कोल्हापुरात बुधवारी ‘बंद’चे आवाहन

मराठा आरक्षणासंदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करा, दोन दिवसांत निर्णय घेण्याची मागणी करत बुधवारी कोल्हापूर कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून येथील ऐतिहासिक दसरा चौकात सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान, आज दुसऱया दिवशीही धरणे आंदोलन करण्यात आले.

जयसिंगपुरात ‘रास्ता रोको’

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जयसिंगपूर शहरातील क्रांती चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे चारही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून टायर विझवून आंदोलकांना शांत केले.

शेकडो कार्यकर्ते सकाळीच क्रांती चौकात जमले. चारही बाजूने कार्यकर्त्यांनी वेढा घातला. सगळी वाहतूक थांबवण्यात आली. जयसिंगपूरचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांनी पोलीस कर्मचाऱयांसह टायर विझवून शांततेचे आवाहन केल्यानंतर ‘रास्ता रोको’ आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव-घुणकीकर, बजरंग खामकर, पराग पाटील, धनाजी देसाई, सागर मादनाईक, शंकर नाळे यांच्यासह समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.