
राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकार हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आयोगाच्या सदस्यांनी केला होता. सरकारचे दोन मंत्री या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप झाला होता. या हस्तक्षेपामुळे आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे देण्यास सुरूवात केली होती. सदस्यांच्या पाठोपाठ आता आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला आहे. हे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे कारण यामुळे मराठा आरक्षणाला सहाय्यभूत ठरेल अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिळवण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यभर गाजतोय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावर मनोज जरांगे पाटील व मराठा समाज ठाम आहे. त्यासाठी जरांगेंनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याची जबाबदारी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाला दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या आयोगाची बैठकांना सुरुवात झाली होती, मात्र या बैठकांनंतर आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले होते.
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही पिटीशन दाखल केली आहे. यावर सुनावणी प्रलंबित असतानाच राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिल्याने सगळ्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या आहेत. निरगुडे यांनी काय कारणे देत राजीनामा दिला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. साधारणपणे एका महिन्यात आयोगाच्या 5 सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. हा आयोग हा स्वायत्त असल्याचे सांगण्यात आले मात्र अनुकूल माहिती मिळावी यासाठी आयोगावर दबाव टाकला जात होता. सर्वेक्षणातून आलेली माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकतो, परंतु सरकारला अपेक्षित माहिती देणे आम्हाला शक्य नसल्याचे आयोगाच्या सदस्यांनी सांगितले होते, तरीही त्यांच्यावर या माहितीसाठी दबाव टाकणे सुरू होते.
राज्य मागासवर्ग आयोगात राज्य शासनाचा हस्तक्षेप वाढला आहे. सरकारकडून आयोगावर दबाव येत असल्याने आयोगातील सदस्य राजीनामा देत आहेत, असा धक्कादायक आरोप राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांनी केला होता. “राज्य मागासवर्ग आयोग ही स्वायत्त संस्था आहे. मात्र आता बाह्य संस्थेतील (शासन) काही लोकांचा हस्तक्षेप होत आहे. त्यामुळे या संस्थेची स्वायत्तता धोक्यात येत आहे. त्यामुळे असं असंविधानिक काम माझ्याकडून होणार नाही म्हणून मी राजीनामा दिला, असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं होतं.”


























































