
आराक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठवाड्यात आरक्षणाचे आंदोलन पेटले आहे. नांदेड, हिंगोली, बीडमध्ये बसवर दगडफेक केल्याने अनेक विभागांतील बसफेर्या बंद करण्यात आल्या. जालन्यात तहसीलदारांच्या वाहनावर दगडफेक करून काच फोडण्यात आली तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास सर्वच आगारांतून बसफेर्या बंद करण्यात आल्या. दरम्यान, पैठण येथे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना काळे फासून संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षण मागणीचे आंदोलन पेटू लागले आहे. बीडमध्ये शनिवारी मध्यरात्री एक बस पेटविण्यात आली तर एक बस जाळण्याचा प्रयत्न झाला. रविवारी सकाळी एक बस फोडण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील बस वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. बसस्थानकामध्ये प्रवाशांची तोबा गर्दी झाली. आरक्षणाच्या मागणीसाठी वडवणीत आंदोलनकर्त्यांनी टॉवरवर चढून उपोषण सुरू केले तर गावागावांमध्ये कॅण्डल मार्च निघू लागले आहेत. आंदोलनकर्त्यांनी बीड-गेवराई रस्त्यावर टायर जाळले.
बीडहून कोल्हापूरकडे जाणारी (एमएच-एफएल ००७५) राज्य परिवहन महामंडळाची बस थांबवून प्रवाशांना खाली उतरवून जमावाने ती पेटवून दिल्याची घटना मध्यरात्री घडली तर याच मार्गावर मांजरसुंबा घाटामध्ये अहमदपूर-छत्रपती संभाजीनगर बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बस न थांबल्याने पुढील अनर्थ टळला. रविवारी सकाळी चर्हाटा फाटा येथे पुण्याला जाणार्या एका बसवर दगडफेक करण्यात आली. सुरक्षेची खबरदारी म्हणून बीड जिल्हा विभागीय नियंत्रकांनी बीडमधील बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बससेवा अचानक बंद झाल्याने बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली. रविवारी सकाळपासूनच बीड बायपासवर मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी ‘चक्का जाम’ करत वाहतूक ठप्प केली. बीड-गेवराई मार्गावर पाडळसिंगीच्या पुलावरही ‘रास्ता रोको’ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणास आज रविवारी शिक्षकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. वडवणी येथे आंदोलनकर्त्यांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली. वडवणीत पुढार्यांना गावबंदी करण्यात आली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले. जिल्ह्यातील बहुतांशी गावांमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला.
धाराशिव शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर शारदीय नवरात्री महोत्सवानिमित्त लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या बॅनरवरील फोटोंना काळे फासण्यात आले. बसवर दगडफेक, टॉवरवर चढून आंदोलन, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या फोटोंचे दहन तर काही ठिकाणी स्वत:ला जमिनीत गाडून घेऊन आंदोलन करण्यात आले. भूम आणि वाशी तालुक्यांत एसटी बसवरील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोंना शाई लावून निषेध व्यक्त करण्यात आला.
हिंगोली जिल्हाभरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. आरक्षणाचा मुद्दा गंभीर होत चालल्यामुळे आंदोलकांकडून महामंडळाच्या बसेस फोडण्यात येऊ नयेत, म्हणून आज रविवारी दुपारपासून हिंगोली शहरासह जिल्ह्यातील पाचही आगारांतील एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत.पैठण बसस्थानकावरून बाहेरगावी जाणार्या सर्व बसगाड्या आज रविवारी दुपारपासून बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील दावरवाडी फाट्यावर एका बसगाडीवरील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड व नांदेड परिसरात अनुचित प्रकार घडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बस आगार प्रशासनाने जाहीर केले. रविवार असल्याने विद्यार्थ्यांना याची झळ बसली नाही. मात्र, तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असल्याने वारकरी आणि पर्यटक कुटुंबांचे मोठे हाल झालेले पहायला मिळाले.


























































