
अभिनेता हेमंत ढोमे स्वतः उत्तम खवय्या. शिवाय पाहुण्यांना खिलवायलाही आवडते.
-‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या?
‘खाणं’ म्हणजे सर्वस्व आणि आयुष्य.
-खायला काय आवडतं?
फेव्हरेट डिश वरण-भात आणि माशाची तुकडी.
-खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
सध्या फक्त खाण्यावरच लक्ष आहे. कारण दोन-तीन सिनेमाचं काम, नाटकाचे प्रयोग एकत्र सुरू असल्यामुळे फारसं लक्ष देता येत नाही, पण अशीही वेळ असते.
-डाएट करता का?
करतो, पण जेव्हा खरंच वजन कमी करण्याची गरज असते तेव्हा करतो. तेव्हा पोळी-भात सोडतो. भाज्या, सलाडवरच राहतो. तेवढे नियंत्रण ठेवतोच.
-आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
बाहेर फारसं खायला आवडत नाही, त्याऐवजी घरी खायला खूप आवडतं. मी आणि पत्नी खूप छान स्वयंपाक करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या डिश बनवण्याचे प्रयोग सुरूच असतात. त्यामुळे घरीच खातो. खाण्याची हौस घरीच पूर्ण होते.
-कोणत्या हॉटेलमध्ये जाता ?
जिथे फिश थाळी किंवा महाराष्ट्रीयन थाळी मिळेल, अशा ठिकाणी आवडतं जायला. पुण्यात जनसेवा भोजनालय, मुंबईत गोवा भुवन इथल्या साध्या थाळ्या आवडतात.
-कोणतं पेय आवडतं?
मँगो मिल्क शेक, सोलकढी.
-प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
खाणं-पिणं महत्त्वाचं. बाकी सगळं होतच राहील. कुडाळला प्रयोग असेल तर नियोजनच असं असतं.दुपारचं जेवण कुठे जेवायचं, प्रयोग संपल्यावर कुठे जेवायचं वगैरे… अशा पद्धतीने खाण्याभोवती दौऱयाचं नियोजन असतं.
-दौऱ्यानिमित्त आवडलेला पदार्थ?
मराठवाडय़ातल्या पाटवडय़ा, संभाजीनगरमधल्या मराठा खाणावळीतले पदार्थ, कुडाळला वैशंपायन यांची खाणावळीत जायला.
-स्ट्रीट फूड आवडतं का?
हो प्रचंड आवडतं. सगळ्यात आवडता वडा-पाव.
-जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?
पत्नी खूप छान मासे बनवत असल्यामुळे माशांचं जेवण खूपदा बनते. मी स्वतः चिकन, मटण उत्तम बनवतो. त्यामुळे पाहुणे घरी आले की, मांसाहारी जास्त होते. पाहुणेही शक्यतो मांसाहारी पदार्थ खाण्यासाठीच येतात.
-उपवास करता का ?
लहानपणी करायचो, आता करत नाही.



























































