
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि संस्कृती टिकवण्यासाठी सदैव झटणाऱया स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आयोजित मराठी भाषा सोहळ्यात आज मायमराठीचा गौरव करण्यात आला. सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘मोगरा फुलला’ सांगितिक कार्यक्रमात ज्ञानोबांच्या ओव्या आणि अभंगांच्या गायनात रसिक न्हाऊन निघाले. मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ साहित्यिक कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडूनही दरवर्षी मराठी भाषा दिन सोहळा साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आयोजित सोहळ्यानिमित्त सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांचा ‘मोगरा फुलला’ हा कार्यक्रम पार पडला. हा सोहळा सुरू होण्याआधी दिवंगत शिवसेना नेते मनोहर जोशी यांना उद्धव ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर महाराष्ट्र राज्य गीताने मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना खासदार आणि अध्यक्ष अनिल देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार विलास पोतनीस, सुनील शिंदे यांच्यासह महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्यासह पदाधिकारी राजीव जोशी, अनिल चव्हाण, प्रदीप बोरकर, वामन भोसले, निलिमा भुर्पे, सुत्रसंचालक उमेश नाईक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप मयेकर, रवींद्र कुवेसकर, वामन भोसले, प्रदीप बोरकर, अनिल चव्हाण, दिनेश बोभाटे, मिलिंद घनगुटकर, उल्हास बिले, शरद जाधव, सुधाकर नर, विलास जाधव, अजय गोयजी, श्रीराम विश्वासराव, शरद एक्के, ललित साने, हेमंत रासम, संदीप गावडे, रमेश गवळी, प्रवीण हाटे, विजय अडसुळे, दशरथ गांधी, शाम परब, नितीन रेगे, किरण फडणीस, प्रदीप पाटील, राजन तांडेल, कृष्षा घाटकर, किरण पिंपुटकर, महेश शिवडावकर, बाळासाहेब कांबळे तसेच महिला आघाडीच्या निलिमा भुर्पे, कल्याणी सावंत, स्मिता तेंडुलकर, राजलक्ष्मी केंकरे, शर्वरी शेटय़े आणि विभागप्रमुख संतोष शिंदे आणि त्यांच्या सहकाऱयांनी विशेष मेहनत घेतली.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – अनिल देसाई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. राज्यासह संसदेत खासदारांनी पाठपुरावा केला. मात्र केंद्राने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आता तरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी मागणी खासदार आणि महासंघाचे अध्यक्ष अनिल देसाई यांनी केली.
सध्या ‘मुह में राम, बगल में ईडी’ – अरविंद सावंत
सध्या ‘मुह में राम, बगल में ईडी’ असा प्रकार सुरू आहे. मात्र शिवसेना ताठ मानेने उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृवाखाली पुन्हा भगवा फडकवणार असा विश्वास खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. लोकाधिकार समिती महासंघामुळे मराठी माणसाचे नाणे खणखणीतपणे वाजत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाचा खऱया अर्थाने उद्धार केला. उद्धव ठाकरे हेदेखील शिवसेनाप्रमुखांनंतर खंबीरपणे शिवसेनेचे नेतृत्व करीत असल्याचे ते म्हणाले.
























































