
मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे अशी मराठी माणसाची इच्छा होती. या इच्छेचा आदर करीत येत्या काळात राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली.
रामटेक येथील कालिदास संस्पृत विद्यापीठाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उदय सामंत नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठी भाषा विद्यापीठाचा मुद्दा फार दिवसांपासून प्रलंबित होता. आता त्यासंदर्भात निर्णय झाला असून या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. या विद्यापीठासाठी जागा देण्याचा प्रस्तावदेखील असून त्यावर विचार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सामंत यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषेच्या प्रचार, प्रसार आणि संशोधनाला वाव मिळू शकणार आहे. तसेच मराठी भाषेचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांनाही या विद्यापीठाची मदत होऊ शकेल.



























































