मूळ संचातील ‘घाशीराम कोतवाल’ आज यूटय़ूबवर, नाट्यरसिकांसाठी पर्वणी 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाटककार विजय तेंडुलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आणि मराठी नाटकाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणारे अजरामर नाटक म्हणजे ‘घाशीराम कोतवाल.’ या नाटकाला उद्या, शुक्रवारी 50 वर्षे पूर्ण होत असले तरी अजूनही ते रसिकांच्या मनात घर करून आहे. नाटकाच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून संगीत नाटक अकादमीतर्फे मूळ संचातील नाटक शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता ‘यूटय़ूब’वर प्रसारित करण्यात येणार आहे. नाटय़रसिकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे.

‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचा पहिला प्रयोग 16 डिसेंबर 1972 रोजी पुण्याच्या भरत नाटय़मंदिरात झाला होता. राज्य नाटय़ स्पर्धेत सादर झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन डॉ. जब्बार पटेल यांनी केले होते. तर डॉ. मोहन आगाशे, चंद्रकांत काळे, श्रीराम रानडे, रवींद्र साठे, मोहन जोशी हे कलाकार होते. लेखक-दिग्दर्शकांइतकेच या नाटकाच्या यशाचे श्रेय संगीतकार भास्कर चंदावरकर आणि नृत्य दिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांनाही जाते. त्याकाळी या नाटकामुळे राजकीय वाद निर्माण झाला होता. दिल्लीत 1989 साली नेहरू शताब्दी नाटय़ महोत्सवात संगीत नाटक अकादमीने ‘घाशीराम कोतवाल’चे चित्रीकरण करून ठेवले होते. नाटकाचा मूळ संचात चित्रीत केलेला प्रयोग संगीत नाटक अकादमीच्या यूटय़ूब वाहिनीवर शुक्रवारी पाहता येईल