नाटय़रंग – मराठी नाटक 2023, नवी ऊर्जा आणि उभारी

पराग खोत << [email protected]  >>

हिंदुस्थानी भाषांमधील सर्वात प्रगल्भ आणि प्रयोगशील असा नावलौकिक मिळवलेली मराठी रंगभूमी गेली अनेक दशके नाटय़रसिकांचे मनोरंजन करत आलीय. गुजराती आणि बंगाली रंगभूमीवरच्या तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज कलाकारांनीसुद्धा, “आम्हाला मराठी रंगभूमीचा हेवा वाटतो” अशी प्रांजळ कबुली अनेकदा दिली आहे. याच मराठी रंगभूमीच्या समस्त शिलेदारांनी 2023 सालातसुद्धा मराठीची ही पताका मोठय़ा दिमाखात डौलत ठेवली असेच म्हणावे लागेल.

गेल्या वर्षभरात आलेल्या जुन्यानव्या नाटकांनी प्रेक्षकांना नाटय़गृहाकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. विभिन्न जातकुळीची नाटके सादर होत असतानाच विनोदी नाटकांनी आपले स्थान या वर्षीही अबाधित राखले. विनोदाचा हुकमी एक्का असलेल्या प्रशांत दामलेंची ‘सारखं काहीतरी होतंय’ आणि ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही दोन नाटकं त्यांच्या प्रेक्षकप्रियतेची पावती देत होती. पस्तीस वर्षांनंतर वर्षा उसगावकर यांनी रंगभूमीवर केलेले पदार्पण आणि प्रशांत-वर्षा या जोडीच्या ‘ब्रह्मचारी’ या गाजलेल्या नाटकाची जादू पुन्हा निर्माण करण्यात ‘सारखं’ बऱयापैकी यशस्वी ठरलं. यासोबतच ‘आमने सामने’, ‘खरं खरं सांग’, ‘करून गेलो गाव’, ‘यदाकदाचित रिटर्न्स’, ‘तू तू मी मी’, ‘पुन्हा सही रे सही’, ‘व्हॅक्यूम क्लीनर’, ‘संज्या छाया’, ‘नियम व अटी लागू’, ‘जर तरची गोष्ट’, ‘किरकोळ नवरे’ आणि नुकत्याच आलेल्या ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकांनी रंगभूमीवरचा विनोद जागता ठेवला. काही वर्षांच्या गॅपनंतर होत असलेला अशोक सराफ, निर्मिती सावंत, वैभव मांगले, रोहिणी हट्टंगडी (‘चारचौघी’) आणि मोहन जोशी (‘सुमी आणि आम्ही’) यांचा रंगभूमीवरचा वावर सुखावून गेला.

‘चारचौघी’ या तीस वर्षांपूर्वीच्या नाटकाचे मागच्या वर्षी झालेले पुनरुज्जीवन आणि त्याला या वर्षातही रसिकांनी दिलेला जोरदार प्रतिसाद बरंच काही सांगून गेला. गंभीर प्रकृतीच्या, आशयगर्भ नाटकांची प्रेक्षकांची भूक निरंतर आहे आणि अशा नाटकांचे प्रयोग सतत होत राहतात हे ‘चारचौघी’सोबतच ‘वाडा चिरेबंदी’ आणि ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकांनी सिद्ध केलं. मुक्ता बर्वेने ‘चारचौघी’तल्या लक्षवेधी परफॉर्मन्सनंतर ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’मधल्या तरल जाणिवा दाखवत आपल्या अभिनयाची रेंज सिद्ध केली, तर संकर्षण कऱहाडेने लेखक, दिग्दर्शक, कवी आणि अभिनेता अशी चौफेर कामगिरी करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ ही त्याची तीन नाटकं सध्या सुरू आहेत. त्यातल्या ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘नियम व अटी लागू’ या नाटकांचा लेखक तर ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकाचा लेखक-दिग्दर्शक संकर्षण आहे. अशीच पामी कामगिरी या वर्षी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या नावावर नोंदवली गेली. ‘नियम व अटी लागू’ हे चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेलं नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं तेव्हा त्यांनी दिग्दर्शित केलेली सहा नाटकं एकाच वेळी मराठी रंगभूमीवर सुरू होती आणि हा एक अनोखा पाम आहे. ‘नियम व अटी लागू’व्यतिरिक्त ‘चारचौघी’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’, ‘संज्या छाया’ आणि ‘मौनराग’ या नाटकांचे प्रयोग 2023 मध्ये होत होते. ‘आम्ही नाटकवेडे’ या पार्ल्यातल्या उपामासाठी काम करताना आलेला नमूद करण्यासारखा अनुभव म्हणजे ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ आणि ‘38 कृष्ण व्हिला’ या नाटकांना सर्वाधिक रिपीट ऑडियन्स लाभला.

सध्याच्या ओटीटी युगात सिनेमाप्रमाणेच नाटकांनीही व्यावसायिक आणि समांतर ही चौकट भेदून वेगळे प्रयोग करण्यास प्रारंभ केला आणि चोखंदळ रसिकांनी त्याला तितकाच उत्तम प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं. ‘पुनश्च हनीमून’मध्ये लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णीने एक वेगळा प्रयोग केला आणि त्याला अमृता सुभाषने उत्तम साथ दिली. ‘एक अवघड नाटक’ असं त्याचं वर्णन करता येईल. ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे मनस्विनी लता रवींद्र लिखित असंच एक अवघड नाटक या वर्षीही रंगभूमीवर होतं. ‘शब्दांची रोजनिशी’ हा रामू रामनाथनचा वेगळा प्रयत्न नाटकाने पछाडलेल्या अतुल पेठेने रंगमंचावर सादर केला. यासोबतच ‘उच्छाद’, ‘अडलंय का’, ‘चोर चोर चोर’, ‘तोडी मिल पॅंटसी’ आणि ‘सॅड सखाराम’ यांच्या उल्लेखाशिवाय पुढे जाता येणार नाही अशी ही लक्षणीय नाटके होत. अक्षय शिंपीने त्याच्या ‘दास्तान ए रामजी’ आणि ‘दास्तान-ए-मुंबई बडी बाँका’ या प्रयोगांतून ‘दास्तानगोई’ या नव्या नाटय़ प्रकाराची ओळख मराठी रंगभूमीला करून दिली, त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक. सोबतच ‘गजब तिची अदा’ हा नृत्यनाटय़ प्रयोग नामांकित दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी करून पाहिला तर ‘देवबाभळी’ या उत्कट अनुभवाने पाचशे प्रयोगांचा टप्पा पार करून रंगभूमीचा निरोप घेतला.

विनोदासोबतच रहस्यनाटय़ हा मराठी रंगभूमीचा आवडता जॉनर आहे. गेल्या वर्षीच्या ‘अ परफेक्ट मर्डर’सोबतच ‘काळी राणी’ आणि ‘यू मस्ट डाय’ या नाटकांनी या वर्षी वर्णी लावली. ‘38 कृष्ण व्हिला’ हे डॉ. श्वेता पेंडसे लिखित रहस्याची डूब असलेलं शब्दप्रधान नाटक रसिकांनी उचलून धरलं, तर त्याच्यासारखाच बाज असणारे चिन्मय मांडलेकरचे ‘गालिब’ सध्या गर्दी खेचतंय. शरद पोंक्षेंचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ प्रेक्षकांचा निरोप घेत असतानाच सौरभ गोखलेचा ताज्या दमाचा ‘नथुराम’ रंगभूमीवर अवतरला, तर विनोदसम्राट भरत जाधव आपलं ‘अस्तित्व’ हे नवं आशयघन नाटक घेऊन आलाय. ‘चाणक्य’ हा इतिहास दर्शनाचा शैलेश दातारचा समयोचित प्रयत्न स्तुत्य म्हणावा असा आहे.

 मराठी नाटकांना बुकिंग मिळत नाही ही ओरड आता कमी झालीय. चांगल्या नाटकांना प्रेक्षक गर्दी करतातच, पण वेगळं काहीतरी करू पाहणाऱया रंगकर्मींच्या मागेही ते उत्साहाने उभे राहतात हे काही नाटकांनी या वर्षी दाखवून दिलं. ‘आई’, ‘अमेरिकन अल्बम’, ‘अवघा रंग एकचि झाला’, ‘चर्चा तर होणारच’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘सफरचंद’ आणि नुकतंच आलेलं ‘आपण यांना पाहिलंत का?’ ही अजून काही नाटके या वर्षी प्रदर्शित झाली. याशिवाय ‘गांधर्वसख्यम्’ हे संस्कृत नाटक, काही संगीत नाटके आणि इतरही वेगळे प्रयोग मराठी रंगभूमीने पाहिले. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा असेल तर उत्तम संहिता आणि वेगळं सादरीकरण करण्याची रंगकर्मींची तयारी आहे हे 2023 ने दाखवून दिलं. जुन्याजाणत्या कलाकारांसोबत नव्यांचा राबता रंगभूमीवर दिसला आणि सगळ्यांनाच आश्वस्त करतील अशी चिन्ह आणि खुणा या वर्षी जागोजागी जाणवल्या. येणाऱया वर्षात मराठी रंगभूमीचा वारसा अधिक समृद्ध करण्याचं सामर्थ्य आजच्या रंगकर्मींमध्ये असल्याचं त्यांनी आणि त्यांच्या सुयोग्य प्रयत्नांना भरभरून दाद देण्याची तयारी रसिक प्रेक्षकांनी दाखवली हीच 2023 सालची खरी मिळकत होय.

(लेखक नाटय़क्षेत्राशी संबंधित संशोधनात्मक लेखन करतात.)