
जास्तीच्या पावसाने पारंपारिक पिकांचे नुकसान केले असले तरी स्ट्रॉबेरी, पेरु आणि बोरांना मात्र फायदा झाला आहे. बाजारात सध्या लाल रंगाच्या स्ट्रॉबेरी, हिरव्यागार रंगाचा पेरू आणि बोरांची रेलचेल झाली आहे. आवक जास्त झाल्याने साहजिकच या फळांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी झाले आहेत. स्ट्रॉबेरी आणि अंजीर सरासरी शंभर रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. तर पेरू तीस ते चाळीस रुपये आणि बोरे पंधरा ते वीस रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहेत.
जिल्ह्यासह राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यात तर सरासरीपेक्षा पन्नास टक्के जास्त पाऊस झाला. मागील तीन वर्षे पावसाअभावी दुष्काळ होता. त्यामुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले. यंदा लांबलेल्या पावसाने पारंपरिक उत्पादनांमधील ज्वारी, बाजरी, मका, कांदा, कापुस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. असे असले तरी फळबागधारकांना मात्र लांबलेल्या पावसाचा फायदा झाला आहे. पावसामुळे फळबागांना बहर जास्त आला आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात यंदा शेतकऱ्यांनी स्टॉबेरी, बोर, पेरू या पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले आहे. सध्या अनेक फळबागांमधील फळे काढणीला आली आहेत. बाजारात मुख्य बाजारपेठेसह ठिकठिकाणी रस्त्याच्या काठावर स्टॉबेरी, अंजीर, पेरू, ऍपल, बोर ही फळे विकणारे दिसू लागले आहेत. गेल्या वर्षी अंजीर आणि स्ट्रॉबेरी किमान दीडशे रुपये प्रतिकिलो होती. पण, यंदा उत्कृष्ट गुणवत्ता असलेली स्ट्रॉबेरी सरासरी शंभर रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे. पेरू, पपईची चाळीस ते साठ रुपये या दराने विक्री होत आहे. खरेदीदार कमी आणि उपलब्धता जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने फळे गेल्या वर्षाच्या तुलनेत स्वस्त झाली आहेत, अशी माहिती फळ विक्रेता मुख्तार शेख यांनी दिली.




























































