लग्न लागण्यापूर्वी हुंडा मागणं महागात, वरपक्षाची वरात पोलीस स्टेशनला पोचली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न लागण्यापूर्वी हुंडा मागणाऱ्या एका नवऱ्याची वरात नवऱ्यामुलीने पार पोलीस स्टेशनला पोहोचवली. ही घटना मध्य प्रदेशच्या रेवा जिल्ह्यात घडली आहे.

रेवा जिल्ह्यातील देवारा गावातल्या शहापूर परिसरात रमा (नाव बदललेले) हिचा विवाह रेवापासून काही अंतरावर राहणाऱ्या धाबा गावातील पियुष (नाव बदललेले) याच्याशी ठरला होता. एक जून रोजी त्याची वरात शहापूर येथे दाखल झाली.

लग्नाच्या नियोजित विधींपैकी मुख्य असलेला वरमाला हा विधी सुरू झाला. पण, त्याच वेळी काही गडबड झाली. वरमाला घालण्यापूर्वी वराच्या नातेवाईकांनी हुंडा मागितल्याची तक्रार वधुपक्षाने केली. त्यामुळे ऐन लग्नात एकच गोंधळ उडाला.

वर पक्ष हुंड्यावर अडून बसल्याने रमाने तिच्या हातातली वरमाला घेतली आणि ती थेट पोलीस स्टेशनला पोहोचली. तिथे तिने नवऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेत चौकशी केली आणि वरपक्षाकडील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हे लग्न रद्द झालं असून या प्रकरणी कायदेशीर लढा देणार असल्याचं वरपक्षाचं म्हणणं आहे.