धक्कादायक! लोकलमधून विवाहितेचे अपहरण करून बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, कर्जत

कर्जतहून खोपोलीकडे लोकलने निघालेल्या महिलेचे नवऱ्यासमोरच गुंडांनी अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची भयंकर घटना शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता पळसदरी स्थानकावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या दीड तासात तीन नराधमांच्या मुसक्या आवळल्या. या घटनेमुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेच्या चिंधडय़ा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

उरणच्या जसखार येथून मानकिवली येथे निघालेली एक महिला व तिच्या पतीने खोपोलीला जाण्यासाठी कर्जत रेल्वे स्थानकावरून 10.40 ची लोकल पकडली. लोकल सुरू होताच कर्जतच्या क्रांतीनगर झोपडपट्टीत राहणारा सूरज चव्हाण हा त्याचा साथीदार अजय राठोड याच्यासह ती महिला ज्या डब्यात बसली होती त्या डब्यात चढले. लोकलने वेग घेताच सूरज आणि अजय यांनी त्या महिलेच्या पतीला मारहाण करून पळसदरी रेल्वे स्थानकावर महिलेला फलाटावर ढकलून दिले.

पळसदरी रेल्वे स्थानकातील अंधाराचा फायदा घेऊन सूरजने आणि अजयने त्या महिलेला खेचत रेल्वे स्थानकाबाहेर नेले. तेथे एक मुलगा आधीच मोटारसायकल घेऊन उभा होता. त्या तिघांनी महिलेला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळसदरीच्या जंगल परिसरात नेले. तेथे सूरजने तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, त्या महिलेचा पती पुढील केळवली स्थानकावर उतरला. त्याचवेळी भजन, कीर्तन आटोपून घरी निघालेले ऍड. राजेंद्र येरुणकर यांना तो पीडित महिलेचा पती दिसला. तेव्हा त्याने घडलेला प्रकार सांगितला.

ऍड. येरुणकर यांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना रात्री बारा वाजता फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. नाईट राऊंडला असलेल्या तानवडे यांनी तत्काळ चार टीम तयार करून अवघ्या दीड तासात त्या महिलेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले.