मथुरेत मंदिरात नमाज पठण करणाऱ्या आरोपी फैसलला दिल्लीतून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील मथुरा शहरातील मंदिरात खोटे बोलून घुसणाऱ्या आणि नमाज पठण करणाऱ्या आरोपीला यूपी पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. दिल्लीतील जामिया नगर भागातून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. फैसल खान असे आरोपीचे नाव आहे. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, हा प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 29 ऑक्टोबर रोजी मथुरेतील नंदबाबा मंदिरात खोटे बोलून प्रवेश केला. यातील दोघांनी मंदिरातील लोकांना भुलवून नमाज पठण केले. याचा फोटो व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध कलम 135ए, 295 आणि 505 अन्वये बरसाना पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिर प्रशासनाने याबाबत तक्रार दिली होती.

मंदिरात नमाज पठण करून व त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेस पोहोचवण्याचे आणि त्यांच्या आस्थांशी खेळ केल्याचा आरोप करण्यात आला. यावर पोलिसांनी कारवाई करत आरोपी फैसलला अटक केली.

म्हणे सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी…

दरम्यान, आरोपी फैसलने प्रसार माध्यमांशी बोलताना सर्वांसमोर नमाज पठण केल्याचे म्हटले. तसेच यावेळी कोणीही आम्हाला रोखले नाही, अन्यथा आम्ही असे केलेच नसते असा दावा आरोपीने केला. तसेच सामाजिक सलोखा वाढावा म्हणून नमाज पठण केल्याचे आरोपी म्हणाला. तसेच राजकीय प्रेरणेने ही एफआयआर दाखल करण्यात आल्याचा दावाही त्याने केला.