गुणवंत विद्यार्थ्यांची मेडिकल, इंजिनीअरिंगची फी पालिका भरणार, दहावीत पहिल्या 25 मध्ये येणाऱया विद्यार्थ्यांना फायदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिका शाळांमधील दहावीच्या परीक्षेत पहिल्या 25 मध्ये येणारा गुणवंत विद्यार्थी बारावी उत्तीर्ण होऊन मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत असेल तर त्याच्या शैक्षणिक वर्षाची फी पालिका भरणार आहे. पालिकेच्या शाळेतून दरवर्षी पहिल्या 25 येणाऱया विद्यार्थ्यांना सध्या प्रत्येकी 25 हजारांचा प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या महत्त्वाकांक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या अभ्यासक्रमांची फी भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

पालिका शाळेत शिकणाऱया विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तू मोफत देण्यात येतात. त्याशिवाय मोफत ‘बेस्ट’ प्रवास, डिजिटल क्लासरूम, टॅब यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पालिका शाळेतील शिक्षण महत्त्वपूर्ण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आता दहावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाऱया 25 विद्यार्थ्यांना करीअर घडवण्यासाठी उच्च शिक्षण घेत असल्यास त्यांची फी पालिका भरणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. या उपक्रमात 2020 मध्ये दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आता बारावी उत्तीर्ण होतील. यातील मेडिकल, इंजिनीअरिंगसारख्या उच्च शिक्षणाला जाणाऱया विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा पहिल्यांदा फायदा मिळणार आहे. शिवाय तांत्रिक, व्यावसायिक पदवीचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक फी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रबोधिनी
  • पालिकेच्या विद्यार्थ्यांना आगामी काळात आंतरराष्ट्रीय दर्जाची मैदाने उपलब्ध करून देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात 100 क्रीडांगणांचा कायापालट करण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी  नॅशनल स्पोर्टस् ऍथोरिटीच्या धर्तीवर क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात येईल. शाळांमध्ये नेमबाजी, बॅडमिंटन, क्रिकेट, बॉक्सिंग, कबड्डी अशा खेळांमध्ये प्रावीण्य असलेल्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.
  • या विद्यार्थ्यांना तज्ञ प्रशिक्षक, डाएटेशियन यांच्याकडून प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण-मार्गदर्शन करण्यात येईल. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करून आपले कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

पालिकेच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, अद्ययावत सुविधा देण्यासोबत त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध कला-क्रीडा उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, जेणेकरून हे विद्यार्थी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात यशस्वी होऊ शकतील. शिवाय पालिकेच्या शाळेत शिकण्यासाठीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे.