हिंदुस्थानचा तिरंगा मानणार नाही, मेहबूबा मुफ्तींचे हिरवे फूत्कार

चौदा महिन्यांच्या तुरुंगवासानंतर मुक्तता झालेल्या जम्मृ-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या राजकीय हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. जम्मू-कश्मीरला 370 कलम हटवण्यापूर्वीचे दिवस पुन्हा मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक करीन असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच हिंदुस्थानचा तिरंगा मानणार नाही अशीही धमकी दिली आहे.

मेहबूबा मुफ्ती या चौदा महिन्यानंतर एका पत्रकार परिषदेतून लोकांसमोर आल्या. पत्रकार परिषदेत त्यांच्या टेबलवर हिंदुस्थानचा तिरंगा राष्ट्रध्वज नव्हता. केवळ जम्मू-कश्मीरचा झेंडा ठेवण्यात आला होता. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये फक्त तिरंगा फडकवण्याची परवानगी आहे. पत्रकार परिषदेत जम्मू-कश्मीरच्या झेंडय़ाकडे हात दाखवून ‘माझा झेंडा माझ्याकडे परत येत नाही तोपर्यंत मी तिरंगा फडकवणार नाही’ असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. हिंदुस्थानला फक्त जम्मू-कश्मीरची जमीन हवी आहे, तेथील माणसे नकोत असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
गेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी 370 कलम रद्द करुन जम्मू-कश्मीरमधील जनतेला शक्तीहीन करण्यात आले. हा घटनाविरोधी बदल आम्हाला मंजूर नाही. याविरुद्द मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन लढा देण्यात येईल अशी घोषणा यावेळी पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीकडून देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या