मोदीच्या अटकेनंतर आता मेहूल चोक्सीला हिंदुस्थानात आणण्याची प्रक्रिया सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीला ब्रिटनमध्ये अटक झाल्यानंतर या प्रकरणातला दुसरा आरोपी मेहूल चोक्सीला हिंदुस्थानात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी ईडी आणि सीबीआयने एंटीगुआ प्रशासनाला दस्तावेज पाठवले आहेत आणि त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले.

चोक्सीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. तपास यंत्रणांनी एंटीगुआ प्रशासनाला दस्तावेज पाठवले असून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले. चोक्सीने गेल्या वर्षी हिंदुस्थानी पारपत्र जमा करून एंटीगुआचे नागरिकत्व स्वीकारले होते. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये चोक्सीच्या प्रत्यार्पणाची मागणी हिंदुस्थानने केली होती. नीरव मोदीला अटक केल्यानंतर त्याचे लवकरात लवकर प्रत्यार्पण करण्यात यावे अशी मागणी हिंदुस्थानने ब्रिटनकडे केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी हिंदस्थान सरकार ब्रिटनच्या संपर्कात असून त्याचे लवकरच प्रत्यार्पण होईल, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी व्यक्त केला.