सुरेल दिवाळी पहाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजय कुळकर्णी 

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात दिवाळी पहाट कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात सादर होताना दिसतात. दिवाळी पहाट ही संकल्पना रसिक प्रेक्षकांत  बऱयापैकी रुजली आहे. यंदा एकूण साडेचार हजार दिवाळी पहाट कार्यक्रम सादर होताहेत. हा बहुधा रेकॉर्ड असेल. लॉकडाऊननंतर प्रथमच सर्वत्र दिवाळी पहाट सादर होत आहे. गेल्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने  कार्यक्रम झाले होते. दिवाळी पहाट सकाळी 6 वाजता सादर होतात. रसिक प्रेक्षक अभ्यंगस्नान करून दिवाळी पहाटला जातात. सजलेलं नाटय़गृह, प्रवेशद्वारात होणारं प्रेक्षकांचे स्वागत, रांगोळ्या दिसतात. प्रेक्षकांनी आणलेला फराळ त्यांच्या मित्रमैत्रिणींना मध्यांतरात ते वाटतानासुद्धा दिसलेत. माहौल हा आनंदाचा असतो, भेटीगाठीचा असतो.

 दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जाहिरातींवर नजर फिरवली तर विनीत गोरे, विद्याधर ठाणेकर आणि दिगंबर प्रभू हे सातत्यानं असे कार्यक्रम सादर करीत आलेत. त्यांनी आपला स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. दिवाळीत नवीन नाटकांच्या जाहिरातीवर नजर फिरण्याआधी दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या जाहिरातीवर प्रामुख्यानं जाते. वेगवेगळ्या संकल्पना आयोजक आखतात आणि प्रेक्षकांना त्या त्या कार्यक्रमाबद्दल आकर्षित करतात. बहुतांशी कार्यक्रम हे हाऊसफुल्ल झालेले दिसतात. प्रेक्षक आगाऊ तिकिटं काढतात. कारण पहाटे 5 वाजता घर सोडल्यावर नाटय़गृहात तिकिटाअभावी जर पदरी निराशा पडली तर? रसिकांची मराठी गाण्यांना पहिली पसंती मिळताना दिसते. अशा कार्यक्रमात गाण्यांबरोबर मुलाखतीसुद्धा निवेदक घेताना दिसलेत. यंदा दिगंबर प्रभू त्यांच्या कार्यक्रमात सुप्रिया पाठक आणि गिरिजा ओक गोडबोले यांच्या मुलाखतीचे आयोजन केले आहे. राजकीय पुढारीसुद्धा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करताना दिसलेत.

  या कार्यक्रमात निवेदक फार महत्त्वाचा असतो. अनेक वर्षे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे निवेदन करणाऱया निवेदिका स्मिता गवाणकर म्हणाल्या, प्रत्येक दिवाळीत चार कार्यक्रम असतात. हे माझे प्रोफेशन असल्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो. कार्यक्रमासाठी पहाटे 5 वाजता घर सोडावं लागतं.  नटूनथटून आलेले प्रेक्षक समोर पाहिले की, आनंद होतो. या कार्यक्रमात सादर होणारी गाणी वेगळी असतात. त्यांची निवड आयोजकांनी केलेली असते. या कार्यक्रमाचीसुद्धा तालीम आम्ही करतो.

दिवाळी पहाट कार्यक्रमाबद्दलची आत्मीयता गायक- कलावंत, निवेदकांशी बोलताना समजते.  मनोरंजनाचा हेतू जरी असला तरी दिवाळीचे औचित्य साधून दिवाळी पहाट सादर होते यातच सर्व काही आलं. म्हणूनच प्रेक्षक त्यासाठी हाऊसफुल गर्दी करीत असावेत.