
राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे येत्या 11 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यानंतर नागपूर ते शिर्डी असा 529 किलोमीटरचा टप्पा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला होईल. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी या महामार्गाची रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ट राईड घेतली. विशेष गोष्ट म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ड्रायव्हिंग करत नागपूर ते शिर्डी हे अंतर पार केले तेव्हा मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला बसले होते. नागपुरातून दुपारी 12.45 वाजता प्रवास सुरू केला आणि 4 तास 29 मिनिटांत, सायंकाळी 5.14 वाजता ते शिर्डीला पोहोचले. या प्रवासाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर काँग्रेसने या गाडीच्या मालकावरुन सरकारला लक्ष केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या 520 किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. तत्पूर्वी हा द्रुतगती महामार्ग असल्याने देवेंद्र फडणवीस यांनी या रस्त्यावरुन 150 च्या स्पीडने गाडी चालवली. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी गाडी चालवतानाचे फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आणि ते लगेचच व्हायरल झाले. यावेळी देवेंद्र फडणवीस चालवत असलेली मर्सिडीज बेंझ Mercedes-Benz G350d या कारने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या गाडीवरून आता काँग्रेसने थेट शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने एक ट्वीट करत फोटो शेअर केले आहेत. त्यावर लिहलं की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बिल्डरची गाडी चालवतायत. मग आता राज्य चालवायला बिल्डरच्या हातात देणार का?,” असा सवाल काँग्रसने उपस्थित केला आहे. याला अद्याप भाजपाकडून कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आलं नाही.
कोण आहेत कुकरेजा?
रिअल इस्टेट क्षेत्रातील कुकरेजा इन्फास्ट्रक्चर ही नावाजलेली कंपनी असून मूळ नागपूरमधील आहे. या कंपनीचे चेअरमन विरेंद्र कुक्रेजा आहेत. ते सध्या नगरसेवक असून नागपूरच्या जरीपटका प्रभागातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. १२ वर्षांपूर्वी त्यांच्या या कंपनीने रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आज, कंपनीची कोट्यवधींची उलाढाल आहे.






















































