
नवरात्र उत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 या मेट्रो मार्गांवर अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी लाखो नागरीक घराबाहेर पडतात. या काळात त्यांना रात्रीच्या वेळी प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिनांक 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत मेट्रो मार्ग 2 अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग 7 च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही 12:20 वाजता सोडण्यात येणार आहे.
कशी असेल ही मेट्रो ची अतिरिक्त सेवा
19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2023 या कालावधीत सुमारे 15 मिनिटांच्या अंतराने एकूण 14 अतिरिक्त सेवांचा समावेश असणार आहे. सध्या मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी 5:55 ते रात्री 10:30 या कालावधीत सुमारे 253 इतक्या सेवा या साडेसात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी 238 आणि रविवार 205 इतक्या सेवा या 8 ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत.
नवरात्र उत्सवाच्या कालावधीत दिनांक 19 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर, 2023 दरम्यान नियमित सेवांनंतर 15 मिनिटांच्या अंतराने 14 अतिरिक्त सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे या अतिरिक्त सेवांच्या कालावधीत मेट्रो मार्ग 2अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग 7 वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री 01:30 वाजता पोहचेल.
























































