
हायकोर्टाचे दार ठोठावल्यावर म्हाडाने दिले घर, मोठय़ा घरासाठी अर्ज करण्यास मुभा
मोडकळीस आलेल्या इमारतीतून बाहेर पडल्यानंतर तब्बल 50 वर्षांनी एका ज्येष्ठ नागरिकाला हक्काचे घर मिळाले आहे. घरासाठी या ज्येष्ठ नागरिकाला न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. याचिका केल्यानंतर म्हाडाने या ज्येष्ठ नागरिकाला घर दिले जाणार असल्याची माहिती न्यायालयात दिली. त्यामुळे पाच दशकांनंतर ज्येष्ठ नागरिकाची ट्रान्झिटच्या घरातून सुटका झाली आहे.
या ज्येष्ठ नागरिकाला दादरमध्ये 666 चौ. फुटांचे घर हवे होते. म्हाडाने लॉटरी पद्धतीने या ज्येष्ठ नागरिकाला शिवडी येथे 333 चौ. फुटांचे घर दिले. ज्येष्ठ नागरिकाने 45 दिवसांत या घराचा ताबा घ्यावा. त्यानंतर ते मोठय़ा घरासाठी अर्ज करू शकतात, असे न्या. गौतम पटेल व न्या. कमल खथा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण
राधेश्याम देवबासनी यांनी ऍड. संजीव सावंत यांच्या मार्फत याचिका केली होती. या ज्येष्ठ नागरिकाचे दक्षिण मुंबईतील एका इमारतीत घर होते. ती इमारत मोडकळीस आल्याने 1971 मध्ये त्यांना घर रिकामे करण्यास सांगितले. त्यांना बोरिवली येथील संक्रमण शिबिरात घर देण्यात आले. तेव्हापासून ते तेथेच राहत आहेत. घरासाठी त्यांनी म्हाडाकडे अर्ज केला. दादर येथे घर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यास म्हाडाने नकार दिला. त्यामुळे त्यांनी ही याचिका केली.
म्हाडाने शिवडीत दिले घर
याचिका दाखल झाल्यानंतर म्हाडाने राधेश्याम यांना लॉटरीद्वारे शिवडी येथे घर दिले. यावर ऍड. संजीव सावंत यांनी आक्षेप घेतला. मोठय़ा घराचे रेडीरेकनर दरानुसार आम्ही पैसे देण्यास तयार आहोत. आम्हाला मोठे घर देण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी ऍड. सावंत यांनी केली होती.
न्यायालयाचे निरीक्षण
म्हाडाने त्यांच्या नियमानुसार घर दिले आहे. या घराचा ताबा 45 दिवसांत तुम्ही घेतला नाहीत तर तुमचा हक्क राहणार नाही. तुम्ही घर ताब्यात घ्या. नंतर मोठय़ा घरासाठी तुम्ही अर्ज करू शकता, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
2019 मध्ये म्हाडाने आणली योजना
मोडकळीस आलेल्या इमारतीतील ज्या रहिवाशांना म्हाडाने घर रिकामे करण्यास सांगितले. घर रिकामे केल्यानंतर ज्यांना नवीन घर देण्यात आले नाही. अशा रहिवाशांना कागदपत्रांची पूर्तता करून म्हाडा घर देईल, अशी योजना म्हाडाने 2019 मध्ये आणली. त्यानुसार राधेश्याम यांनी कायमस्वरुपी घरासाठी अर्ज भरला. त्यांना म्हाडाने नवीन घरासाठी पात्र ठरवले.
























































