
अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करा, असे सक्त निर्देश ‘म्हाडा’ने दिले आहे. ‘म्हाडा’कडून आज मुंबईत जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींची प्रत्यक्ष व्हिजिट करून तपासणी करण्यात आली. यानंतर अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश देण्यात आले.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींची पाहणी सर्वेक्षण मंडळाकडून करण्यात आली. यावेळी स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ‘सी-1’ (अतिधोकादायक) इमारती अतिवृष्टीत कोसळल्यास रहिवाशांच्या जिवाला धोका असल्याने उपकरप्राप्त इमारतींची पाहणी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केली. अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱया नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने इमारतींची अवस्था अत्यंत धोकादायक असल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारती रिकाम्या कराव्यात, असे आवाहन जयस्वाल यांनी यावेळी केले.
96 इमारती अतिधोकादायक
मुंबईत सध्या 13 हजारांहून अधिक उपकरप्राप्त इमारती असून त्या 80 ते 100 वर्षे जुन्या आहेत. पावसाळ्यात या इमारती कोसळून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी पावसाळ्यापूर्वी म्हाडाकडून सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादीच जाहीर केली जाणार आहे. गेल्या वर्षी या सर्वेक्षणात 96 इमारती अतिधोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते.
रहिवाशांना संक्रमण शिबिराऐवजी भाडे
अतिधोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात म्हणून म्हाडाकडून संबंधित रहिवाशांना इशारा नोटीस दिल्या जाणार आहेत. तसेच या रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठवण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत म्हाडाकडे संक्रमण शिबिरे शिल्लक नसल्यामुळे दरमहा 20 हजार रुपये भाडय़ाचा पर्याय रहिवाशांना देण्यात आला आहे. रहिवासी आता कोणता मार्ग स्वीकारतात याकडे लक्ष लागले आहे.



























































