
सामना ऑनलाईन । मुंबई
गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर निर्णय घेत सरकारने दुधाला २५ रुपये प्रतिलिटर भाव देण्याची मागणी मान्य केली. दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ही घोषणा केली. यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या दोघांमध्ये झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राजू शेट्टी यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या चार दिवसांपासून हे आंदोलन सुरू होते.
‘दूध’दर आंदोलनाला यश, मागण्या मान्य
राजू शेट्टी यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. दूध पावडर निर्माण करणाऱ्यांना सरकारकडून पाच रुपयांचे अनुदान मिळणार आहे. परंतु त्यांनी शेतकऱ्यांनी २५ रुपयांचा भाव दिला तरच त्यांना हे अनुदान मिळणार आहे. सरकारने निर्णयाबाबत दक्षता घेतली.’ तसेच या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावी अशी आमची मागणी आहे, असेही ते म्हणाले. सरकारने राज्यातील दूध व्यावसायाला मजबुती द्यावी आणि इतर राज्यातून होणाऱ्या दूध आयातीवर नियंत्रण आणावे असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. उद्यापासून दूध पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन शेट्टी यांनी दिले.
Maharashtra: Raju Shetty, Swabhimani Shetkari Sanghatna chief, calls-off the protest demanding price hike for milk farmers after the state government announced Rs 25 per litre as the minimum rate of milk for dairy farmers from July 21. pic.twitter.com/bzPOMOw4sw
— ANI (@ANI) July 19, 2018



























































