
सामना प्रतिनिधी । मुंबई
‘मेक इन इंडिया’, ‘मेक इन महाराष्ट्र’ यावर आरोप करणाऱ्या विरोधकांना कंटाळा कसा येत नाही? त्यांनी महाराष्ट्रात डोळे उघडून पाहावे असे सांगत आरोप करणाऱ्या विरोधकांना ‘उघडा डोळे, बघा नीट’ अशा शब्दांत सडेतोड उत्तर दिले. यावेळी महाराष्ट्रात झालेल्या थेट गुंतवणुकीची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मॅग्नेटिक महाराष्ट्रावर आक्षेप घेतले जातात, पण या माध्यमातून उद्योगधंद्यांचे 3842 प्रपोझल आले. 286 प्रोजेक्ट पूर्ण होऊन उत्पादनात गेलेले प्रकल्प, 276 बांधकाम चालू, 2666 जमिनी घेतल्या आहेत. एमओयूपैकी 84 टक्के प्रकल्प प्रक्रियेत आहेत. सीएट टायर्स, रेमंड, जीई इलेक्ट्रिक, फिलिप्स इंडिया, पर्किन्स, सातारा फूड पार्कस्, पैठण फूड पार्क, हायर इलेक्ट्रॉनिक्स, कॅमलिन कोकोयू यासारख्या कंपन्या आल्या आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक, हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होत आहेत.
मेक इन इंडियामुळे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, कूपर इंजिनियरिंग यासारख्या कंपन्यांनी महाराष्ट्रात उद्योग सुरू झाले. 2014 ते 18 या चार वर्षांत 21 लाख 61 हजार थेट गुंतवणूक आली. त्यापैकी महाराष्ट्रात सहा लाख 50 हजार कोटींची गुंतवणूक झाली. माहिती तंत्रज्ञान खात्यात 19 हजार 460 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
समृद्धी महामार्ग राज्याच्या दृष्टीने गेम चेंजर – एकनाथ शिंदे
समृद्धी महामार्ग हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प. मुंबई-पुणे रस्त्याप्रमाणेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. समृद्धी महामार्ग एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते, मात्र 93 टक्के जमीन ताब्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसने पैसे मिळाले. या पैशातून दुप्पट जमीन घेऊन गाड्याही खरेदी केल्या, असे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मराठवाडा, विदर्भातील आत्महत्याही या प्रकल्पामुळे थांबतील. कृषी क्षेत्रासंबंधित उद्योग या महामार्गालगत उभे राहतील, असेही ते म्हणाले.
























































